Video : संसदेत टोकाची टीका, टोकाचा विरोध, पण मनमोहन सिंग यांचा असा 'शायराना' अंदाज ज्यानं नवा आदर्श घालून दिला!
Manmohan Singh Passed Away : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या संसदेतील एका शायराना भाषणाची नव्याने चर्चा होत आहे. अत्यंत सयमाने ते विरोधकांच्या टीकेला उत्तर द्यायचे.
मुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh Passed Away) यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांनी पंतप्रधानपदी असताना अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांनी गरीब, वंचितांच्या कल्याणासाठी राबवलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे भारतातील कोट्यवधी लोक दारिद्र्य रेषेच्या वर आले. दरम्यान, ते एक दूरदृष्टी असलेले धोरणी राजकारणी होते. विरोधकांच्या टीकेला ते संयमाने, तोल न ढळू देता प्रत्युत्तर द्यायचे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) आणि मनमोहन सिंग यांच्या संसदेतील द्वंदाची आणि त्यांचा शायराना अंदाजाची चर्चा होत आहे.
मनमोहन सिंग यांचा शायराना अंदाज
संसदेत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोकाचा विरोध करतात. विरोधक सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवतात. तर सत्ताधारी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतात. याच संसदेत देशाला नवा आकार देणारे धोरणात्मक निर्णय घेतले जातात. मात्र अनेकवेळा खासदारांकडून आक्षेपार्ह टीका टिप्पणी केली जाते. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज आणि मनमोहन सिंग यांच्यातील टीका आणि टीकेला दिलेले उत्तर मात्र फारच वेगळे आणि राज्यकर्त्यांपुढे नवा आदर्श निर्माण करणारे आहे. मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज यांनी एकमेकांवर टीका करताना कुठेही पातळी ढळू दिलेली नाही. दोघांनीही एकमेकांना शायराना अंदाजात उत्तरं दिली होती. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिलेल्या उत्तरामुळे संसदेत हशाही पिकला होता.
संसदेत नेमकं काय घडलं होतं?
संसदेतील हा प्रसंग 2013 सालातील आहे. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते. देशाचं नेतृत्व करत असल्याने विरोधक त्यांच्यावर सडकून टीका करायचे. संसदेत तर मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या धोरणारावर भाजपाकडून गंभीर स्वरुपाचे आरोप केले जायचे. याच आरोपांना उत्तर म्हणून तोल ढळू न देता मनमोहन सिंग यांनी संसदेत एक दोन ओळींचा शेर म्हणून दाखवला होता. 'हमको है उनसे वफा की उम्मीद, जो जानते नही वफा क्या है', असं म्हणत मनमोहन सिंग यांनी भाजपावर निशाणा साधला होता. भाजपाला उद्देशून म्हटलेल्या या शेरमुळे संसदेत सत्ताधारी काँग्रेसने तेव्हा टाळ्यांचा कडकडाट केला होता.
सुषमा स्वराज यांचेही समर्पक उत्तर
मनमोहन सिंग यांच्या या शेरला सुषमा स्वराज यांनीदेखील तेवढ्याच शायराना अंदाजात उत्तर दिले होते. शायरीचा एक वेगळा कायदा असतो. शेर कधीच उधारी ठेवला जात नाही. मनमोहन सिंग यांचा शेर मला उधार ठेवायचा नाही. त्यामुळे मी एक नव्हे तर दोन शेर वाचते. 'कुछ तो मजबुरीयाँ रही होगी, युँही कोई बेवफा नही होता. तुम्ही या देशासोबत बेवफाई करत आहात त्यामुळे आम्ही तुमच्याप्रती वफादार राहू शकत नाही, असे सुषमा स्वराज पहिला शेर बोलताना म्हणाल्या होत्या. तसेच 'तुम्हे वफा याद नही, हमे जफा याद नही. जिंदगी और मौत के दो ही तो तराणे है, एक तुम्हे याद नाही एक हमे याद नही,' असा दुसरा शेर सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांना उद्देशून बोलून दाखवला होता.
2011 सालीदेखील शेरला शेरमधून उत्तर
अशाच एका 2011 सालच्या प्रसंगात सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका करताना एक शेर सांगितला होता. तुम्हाला उर्दू भाषा चांगल्या प्रकारे समजते. आपलं मत सोप्या शब्दांत, अगदी साध्या पद्धतीने सांगण्याची शेरमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळेच एका शेरच्या माध्यमातून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच "तू इधर-उधर की ना बात कर, ये बता की कॉफिला क्यो लुटा, हमे रहजनोंसे गिला नाही, तेरी रहबरीका खयाल है" अशा समर्पक शब्दांचा वापर करून सुषमा स्वराज यांनी मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली होती. सुमषा स्वराज यांच्या या टीकेला मनमोहन सिंग यांनीही तेवढ्याच समर्पक अंदाजात उत्तर दिले होते. माना की तेरी दीद के काबील नही हूँ मै, तू मेरा शौक तो देख मेरा इतजार तो कर, असे मनमोहन सिंग म्हणाले होते.
Video :
मनमोहन सिंग, सुषमा स्वराज यांनी आदर्श घालून दिला
दरम्यान, एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असूनही या दोन्ही नेत्यांनी संयमी राहून एकमेकांना दिलेली उत्तरं आजच्या स्थितीत आदर्श ठरावीत अशीच आहेत. त्यांनी भाषेचा, शब्दशृंगाराचा, काव्यात्मकतेचा योग्य वापर केला होता. एकमेकांचा आदर ठेवून टीकेला कसे उत्तर द्यायचे त्याचे उदाहरण सुषमा स्वराज तसेच मनमोहन सिंग यांनी घालून दिले होते. मात्र डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. सुषमा स्वराज यादेखील आपल्यात नाहीत. मात्र सिंग यांच्या निधनानंतर या जुन्या व्हिडीओची नव्याने चर्चा होते आहे.
हेही वाचा :