(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bachchu Kadu : शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा सरकार बनते, आमदार बच्चू कडू यांचे वक्तव्य
शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते. त्यामुळे भीती कुणाचीही नसल्याचेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.
अमरावतीः दिव्यांगाना कमजोर समजणे म्हणजे नाना पटोले यांचा नासमजपणा आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम असल्याचे आमदार बच्चू कडूंनी नाना पटोले यांच्या दिव्यांगांवरील वक्तव्यानंतर सांगितले. तसेच नानांनी आपले शब्द मागे घ्यावे अशी मागणी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेधही केला.
पुढे कडू म्हणाले, राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन मंत्री आहेत. असे पहिल्यांदा झाले नसून यापूर्वीही अनेकदा झाले आहे. ते दोघेही राज्य सांभाळण्यास सक्षम आहेत. त्यांच्यासमोर काही अडचणी असल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार लांबला गेला आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार झाला नाही तरी, शेतकऱ्यांचे काही नुकसान झालेले नाही. त्यांना विविध सवलती देण्याच्या घोषणा राज्यसरकारने केल्या आहेत. मदत भेटली नाही असं होणार नसून तसे झाल्यास आम्ही आधी शेतकऱ्याच्या पाठीशी राहू मग सरकारच्या अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
ओला दुष्काळ निकषानुसार
अजित पवार यांच्या ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी काही निकष असतात. त्यानुसारच ते जाहीर करण्यात येते. याची संपूर्ण कल्पना विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना आहे. सरकारने मदतीची घोषणा आधीच केली असल्याने आंदोलन करण्याची गरज नाही. मदत मिळाली नाही तर मग आम्ही सुद्धा आंदोलन करू असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे आमदार गेले तरी सरकार सुरक्षित
मंत्रिमंडळ विस्तार करायला कुणाचीही भीती नाही. मंत्रीमंडळ विस्तार हा अंतर्गत प्रश्न आहे. केंद्रात भाजप सरकार राज्यात भाजप सरकार त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. शिवसेनेचे 40 आमदार गेले तरी सुद्धा भाजप आणि अपक्ष मिळून सरकार बनते, त्यामुळे दबाव नसल्याचेही यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले. तसेच राज्यात अतिवृष्टी झाली आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघेही दौरे करून माहिती घेत आहेत. विस्तार करण्यापेक्षा दौरे करणे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.