Sanjay Raut : 'महाराष्ट्रात पुन्हा शिवसेनेची सत्ता आणायचीय, पण मिळेल त्या मार्गाने नाही' : संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिवाय त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणायची आहे, असंही म्हटलं आहे.
Sanjay Raut Live News : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. शिवाय त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता आणायची आहे, असंही म्हटलं आहे. लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वादळांमध्ये शिवसेनेचे पाठिशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या भेटीतून शिंदे यांना नक्कीच बोध मिळेल. ते एकनिष्ठता वगैरे सारख्या गोष्टी त्यांच्याकडून शिकतील, असं संजय राऊत म्हणाले.
शिंदे गटाकडून होणाऱ्या नियुक्त्यांसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना इथंच आहे. ते कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. त्यांना अधिकार काय आहे. हा पोरखेळ चालला आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहात नाहीत. आपला संबंध काय आहे पक्षाशी, असंही ते म्हणाले. ज्या वृक्षाच्या सावलीत मोठे झाले, फळं खाल्ली. आपण बाजूला झालेला आहात, आपण दुसरा पक्ष स्थापन करावा आणि आपलं आस्तित्व दाखवा, असं ते म्हणाले. राज्यात सत्तांतर होईल या मताशी मी ठाम आहे, असंही ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही, लोकांकडून लोकशाही मार्गाने सत्ता आणू, असं राऊत म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा दौरा करत आहेत ही चांगली गोष्ट आहे. राज्यात पावसानं मोठं नुकसान झालं आहे. विरोधी पक्षनेते दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही. दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या आहेत. यातून वेळ काढून मुख्यमंत्री राज्यात फिरणार असतील तर यावर टीका करण्यासारखं काही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना ते म्हणाले की, याबाबत मला माहिती नाही. इथं हम दो और हमारे दो वाले याचं कारण सांगू शकतील. आता एक महिना होत आलाय, असं ते म्हणाले.
संजय राऊत काय आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहिती
ईडीच्या नोटिशीवर बोलताना ते म्हणाले की, आम्ही कायद्याचं पालन करणारे लोकं आहोत. राजकीय दबावासाठी हे सगळं चाललेलं आहे. माझा आवाज दाबण्यासाठी हे सुरु आहे. संजय राऊत काय आहे हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना सोडणार नाही. मी गुडघे टेकणार नाही, असंही राऊत म्हणाले.