(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde and Amit Shah : मोठी बातमी : महायुतीच्या बैठकीआधी एकनाथ शिंदेंनी चक्र फिरवली, अमित शाहांसोबत बैठक घडवली
Eknath Shinde and Amit Shah : महायुतीच्या बैठकीआधी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शाहांसोबत बैठक घडवली होती.
Eknath Shinde and Amit Shah, Mahayuti Meeting : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीने मोठं यश मिळवलं. 288 पैकी 236 जागांवर महायुतीचे (Mahayuti) उमेदवार निवडून आले आहेत. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरलाय. भाजपच्या 132 जागा निवडून आल्या आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या (Shivsena Eknath Shinde) 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Ajit Pawar NCP) 41 जागा निवडून आल्या आहेत. दरम्यान, महायुतीने निवडणुकीत यश मिळवलं असलं तरी अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय झालेला नाही.
महायुतीची बैठक होण्याच्या आधी, शाह यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपद आणि कोणाला किती मंत्रीपदं मिळणार यावर खल सुरु आहे. महायुतीच्या नेत्यांची गुरुवारी (दि.28) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची एक बैठक दिल्लीत पार पडली. महायुतीची बैठक होण्याच्या आधी, शाह यांनी शिंदे यांना भेटायला बोलावले होते. अमित शाह आणि एकनाथ शिंदे हे दोघेच फक्त या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर अमित शाह यांनी जे पी नड्डा यांना बोलावले. शाह, शिंदे आणि नड्डा अशी एक दुसरी बैठक त्यानंतर झाली. तब्बल अर्धा ते पाऊण तास या तिघांची बैठक सुरु होती. त्यानंतर फडणवीस आणि पवार यांना फोन करून बैठकीसाठी येण्याचा निरोप देण्यात आला होता. मात्र आधी झालेल्या बैठकीत शाह आणि शिंदे यांच्यात कोणती चर्चा झाली ही माहिती गुलदस्त्यात आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडणार?
राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा आझाद मैदानावर पार पडणार आहे. महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पार पडेल. निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. अखेर मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आता समोर आली आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार हे स्पष्ट झालेले नाही. महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या