Nagpur Congress नागपूर शहर कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी लॉबिंग, वंजारी, गुडधे, पांडव यांच्या नावांची चर्चा
नागपूर शहर कॉंग्रेसमधील शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर नेत्यांनी आपआपल्या 'गॉडफादर'कडे 'लॉबिंग' सुरु केली आहे. मोठ्या नेत्यांनीही आपल्या उमेदवारासाठी हायकमांडकडे बोलणी सुरु केली आहे.
Nagpur Politics : आमदार विकास ठाकरे यांनी नागपूर शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर, राजेंद्र मुळक यांनी जिल्हाध्यक्षपादाचा राजीनामा देताच या पदांसाठी कॉंग्रेस नेत्यांची लॉबिंग सुरु केली आहे. शहर अध्यक्षपदासाठी आमदार अभिजित वंजारी,ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे आणि दक्षिण नागपूर विधानसभेत कॉंग्रेसच्या तिकिटावर लढलेले गिरीश पांडव यांची नावे चर्चेत आहे. यापैकी आमदार अभिजित वंजारी हे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जवळचे आहे. तसेच त्यांना मुत्तमेवार गटाचेही समर्थन असल्याने त्यांच्या नावावर सकारात्मक विचार होण्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
उदयपूरच्या चिंतन शिबिरात 'एक व्यक्ती, एक पद'ची सर्वप्रथम अंमलबजावणी करीत कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी प्रचार समितीच्या पदाचा राजीनामा दिला होता. उदयपूरच्या ठरावांची चर्चा शिर्डी येथील नवसंकल्प सभेत झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यभरातील कॉंग्रेस नेत्यांना याची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. राजेंद्र मुळक आपली पहिली टर्म (2017)मध्ये आठ महिने तर ऑगस्ट 2018मध्ये दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले.
पांडव यांच्यासाठी पालकमंत्र्यांची 'फिल्डिंग'
गिरीश पांडव यांच्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडून लॉबिंग सुरु असल्याची माहिती आहे. दुसरीकडे प्रफुल्ल गुडधे यांच्यासाठी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्याकडून जोर लावण्यात येत आहे. या गुंतागुंतीमध्ये कोणत्या गटाकडे अध्यक्षप जाईल याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.
चार प्रदेशाध्यक्ष बदलले तरी ठाकरे कायम?
आमदार विकास ठाकरे यांना शहराध्यक्षपदावरुन हटविण्यासाठी कॉंग्रेसचा एक गट सतत सक्रिय होता. त्यांना पदावरुन दूर करण्यासाठी अनेक नोत्यांनी दिल्लीवारी केली. मात्र सर्वांच्या प्रयत्नांना अपयश आले. ठाकरे मागील आठ वर्षांपासून नागपूर कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदावर कायम होते. यादरम्यान महाराष्ट्र कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि आता नाना पटोले असे चार प्रदेशाध्यक्ष बदलले तरी ठाकरे आपल्या पदावर कायम होते हे विशेष. 2017 मध्ये ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसने लढलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना शहर अध्यक्षपदावरुन हटविण्याच्या मागणीने जोर धरला होता.
पुन्हा बसणार का गटबाजीचा फटका?
शहर कॉंग्रेसमध्ये नेहमीच विविध निवडणूकीपूर्वी गटबाजी वाढण्यास सुरुवात होते. याचा थेट फायदा विरोधकांना होतो. अनेकवेळा चांगली संधी असूनही अंतर्गत गटबाजीमुळे कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. यंदाही आगामी मनपा निवडणूकीत आपल्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी म्हणून नेते आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम!
नागपूर शहर कॉंग्रेसमध्येच नव्हे तर युवक कॉंग्रेसमध्येही गटबाजी पहायला मिळत असल्याने आपल्या फेव्हरमधील नेता आपल्याला तिकीट देऊ शकेल का अशी शंका कार्यकर्त्यांमध्ये आहे. यंदा नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग रचनेत एक वार्ड किंवा दोन वार्डचा एक प्रभाग राहणार असून तुम्ही तयारीला लागा असे युवक कॉंग्रेस नेत्यांने आपल्या समर्थकांना सांगितले होते. मात्र तीन वार्डचा एक प्रभाग झाल्याने या युवा कार्यकर्त्यांचा जोश थंडावला आणि पूर्वी सामाजिक कार्यक्रमांच्या गर्दीत असणाऱ्यांनी सामाजिक कार्यक्रमातून हळू-हळू आपला पाय काढला.