अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहितेंचा मोठा निर्णय! शिवाजीराव आढळरावांचा मार्ग सुकर; शिरुरचा तिढा सुटला?
अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मोहिते पाटलांची नाराजी दूर झाली असून ते आता आढळराव पाटलांचा प्रचार करणार आहेत.
पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 20 मार्च रोजी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांची भेट घेतली. शिवाजीराव आढळराव पाटील (Shivaji Adhalrao Patil) यांना शिरुरमधून उमेदवारी देण्यास दिलीप मोहिते पाटील यांनी थेट विरोध केला होता. त्यामुळे मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवारांनी (Ajit Pawar) ही भेट घेतली आहे. या भेटीनंतर आता मोहिते पाटलांचा सूर नरमल्याचं दिसतंय. मी आढळराव पाटलांचा प्रचार करणार पण शिवसेनेबद्दलची माझी नाराजी कायम आहे, असं दिलीप मोहिते पाटील म्हणालेत.
दिलीप मोहिते पाटील नेमकं काय म्हणाले?
आम्ही सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही अजित पवार यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. उद्या अजित पवार यांचं नेतृत्व अडचणीत येणार असेल तर आम्ही आमच्या भावनांना आवर घालणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी त्यादृष्टीने निर्णय घेतला आहे. माझे आणि आढळराव पाटलांचे टोकाचे मतभेद आहेत. पण हे मतभेद विसरून मला त्यांच्यासोबत जायचं आहे. त्यांचं काम मला करायचं आहे, असं मोहिते पाटलांनी सांगितलं.
अजित पवारांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला
आढळरावांचा एखादा गट तयार होऊ नये. या गटामुळे मला राजकीय त्रास होऊ नये, अशी माझी भूमिका होती. म्हणूनच मी अजित पवार यांना बोलावलं होतं. आमच्यात चर्चा झाली. अजित पवार यांनीदेखील मोकळेपणाने समर्पक उत्तरं दिली. त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांच्या मनातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही मोहिते पाटलांनी दिली.
अजित पवारांनी उमेदवार पळवला
शिरूर लोकसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. या संदर्भातील घोषणा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आमदार दिलीप मोहितेंच्या उपस्थितीत केली आहे. त्यामुळे कट्टर राजकीय विरोधक असणाऱ्या आढळरावांचा प्रचार मोहिते पाटलांना करावा लागणार आहे. याआधी अजित पवार यांनी आढळरावांना तिकीट दिलं तर मी राजकारण सोडेन, असा थेट इशाराच मोहिते पाटलांनी दिला होता. मात्र आता त्यांचा सूर नरमला आहे. आढळरावांसंदर्भातील नाराजी कायम असली तरी मोहिते पाटील आता त्यांचा प्रचार करणार आहेत.
आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीच शिरुर या मतदारसंघाची विशेष चर्चा होती. कारण या जागेवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अमोल कोल्हे हे निवडणूक लढवणार आहेत. या जागेवरून आमचाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास याआधी अजित पवारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्यापुढे थेट आव्हानच उभे राहिले होते. आता मात्र आढळराव आणि अमोल कोल्हे यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे या जागेवर कोणाचा विजय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा
अमोल कोल्हेंविरोधात अजित पवारांनी डाव टाकला; नाना पाटेकरांना उमेदवारीबाबत विचारलं पण...