फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींचं शिवरायांच्या फोटोसहित ट्विट; महायुतीमध्ये ठिणगी?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर संबंधित ठेकेदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर राज्य सरकारला लक्ष्य करत विरोधकांनी आज निदर्शनेही केली आहेत. तर, विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या घटनेचं राजकारण केलं जात असल्याचा पलटवार करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं. यावेळी, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर खऱ्या मावळ्याने ते फोटो व्हायरल केले नसते असे म्हणत फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केलं. मात्र, फडणवीसांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर महायुतीमधील घटकपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी पुतळा कोसळल्याचे फोटो ट्विट करुन महायुती सरकारलाच प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येतंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नौदलाच्या माध्यमातून उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्यानंतर संबंधित ठेकेदारावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेवरुन राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पलटवार केला आहे. ''छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याचठिकाणी नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली. मात्र, फडणवीसांच्या या विधानानंतरच काही वेळात महायुतीमधील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करुन भग्न अवस्थेतील फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे, आता महायुतीत नेमकं काय चाललंय, असा सवालही उपस्थित होत आहे.
''महाराज माफ करा, कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी'', असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. त्यामुळे, एकप्रकारे फडणवीसांच्या विधानावरच त्यांनी आक्षेप घेतल्याचं दिसून येतंय.
महाराज माफ करा 🙏🏼 कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडुन पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय,मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी 😔 pic.twitter.com/5gEiihuzvc
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2024
अनिल देशमुखांची बोचरी टीका
वाऱ्याच्या वेगामुळे हा पुतळा खाली कोसळल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र, ताशी 45 कि.मी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे कोकणात नारळाच्या झाडावरून नारळही लवकर पडत नाहीत, पण भ्रष्टाचार मात्र उघडा पडला, असे ट्विट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलय. देशमुख यांनी आपल्या ट्विटमधून राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
हेही वाचा
स्कूल चले हम... शाळेच्या बस पिवळ्याच रंगाच्या का असतात?; जाणून घ्या नेमकं कारण