Devendra Fadnavis: गोपीचंद पडळकरांनी बोलताना संयम ठेवला पाहिजे, पण तो चांगलं भविष्य असणारा नेता: देवेंद्र फडणवीस
maharashtra cabinet expansion: राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 39 जणांना मंत्रिपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीसांचं गोपीचंद पडळकरांबाबत महत्त्वाचं वक्तव्य
नागपूर: महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा रविवारी नागपूरमध्ये राजभवनाच्या प्रांगणात संपन्न झाला. यावेळी 33 जणांना कॅबिनेट आणि 6 आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपकडून मंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या गोपीचंद पडखळकरांचा अंतिम यादीत समावेश नव्हता. त्यामुळे शरद पवार आणि मविआच्या नेत्यांवर तुटून पडणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना भाजपने मंत्रिपद का दिले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
प्रस्थापितांना भिडणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना मारकडवाडी आंदोलन नडलं का? असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, मला असं वाटत नाही. गोपीचंद पडळकर हे आताच विधानसभेत निवडून आले, यापूर्वी ते विधानपरिषदेत होते. गोपीचंद पडळकर हे उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत. ते थोडे आक्रमक आहेत. हो निश्चितपणे आम्ही त्यांना सांगितलं आहे की, बोलताना त्यांनी संयम ठेवला पाहिजे. पण गोपीचंद पडळकर हे एक चांगलं भविष्य असणारा तो नेता आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
विरोधी पक्षनेते पदाबाबत फडणवीस काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते. त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षांनी घ्यायचा असतो. अध्यक्ष जो निर्णय घेतील तो मान्य असेल, आमची अडवणूक आणि दबाव नसेल. आम्ही निर्णयाचा सन्मान करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अडीच वर्षांच्या मंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांच्या मंत्रिपदाबाबत एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. अडीच वर्षांसाठी मंत्रिपद दिलं म्हणजे काहीही करावं असं नाही. सगळ्या मंत्र्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल, असे शिंदे यांनी म्हटले. आम्ही तिघांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलं, सगळ्यांच्या कामाचे ऑडिट होणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. आमचा प्रयत्न हे मंत्रिमंडळ सर्वप्रकारचा चेहरा दिसला पाहिजे त्यादृष्टीने जुनेजाणते आणि नव्या चेहऱ्यांना आणि सगळ्या समाजांना संधी देण्यात आली आहे. वेगवेगळी कारणं आहेत, काही मंत्र्यांना घेण्यात आले नाही, पण पक्षाने वेगळी जबाबदारी द्यायचे ठरवले आहे, काहींना कामगिरीमुळे ड्रॉप करण्यात आले, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी वाचा