Devendra Fadnavis : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, ते महायुतीत येत आहेत का? प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं 'एका' शब्दात उत्तर
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर भाष्य केलं आहे.

नवी मुंबई : एकीकडे राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असताना आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आलेल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात फेरबदल होणार आहेत. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता या पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील फेरबदलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील आणि शशिंकात शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई विमानतळ येथील कामांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांना संबोधित केलं. यावेळी त्यांना पत्रकारांनी राष्ट्रवादीत होणाऱ्या फेरबदलांबाबत विचारण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा जयंत पाटील यांनी दिला असून आता त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची निवड होणार असल्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 'हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, ज्यांनी राजीनामा दिला त्यांनाही शुभेच्छा, जे नवीन होणार त्यांनाही शुभेच्छा, सगळ्यांनी चांगलं काम करावं या शुभेच्छा', असं म्हटलं. यानंतर पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना ते महायुतीत येत आहेत का ? असा प्रश्न विचारला याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नाही असं उत्तर दिलं.
नवी मुंबई विमानतळाची पाहणी
देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही आलो होतो असं म्हटलं. सर्व माहिती घेतली आहे, भौतिक प्रगती 94 टक्के झाली आहे. बाहेरचे जे सिलिंग आहे त्यांचे काम वेगाने करावे लागेल. बॅगेचा बारकोड 360 डिग्री वाचता येऊ शकतो. या एअरपोर्ट वर बॅगेज हे जगातील फास्टेज असले पाहिजे. हे विमानतळ मुंबई च्या एअर पोर्ट पेक्षा मोठ असेल. चारही दिशांनी इथे येण्यासाठी सोय असेल, मेट्रो, रेल्वे ,वॉटर, ट्रान्सपोर्ट असा प्रयत्न असेल. बॅगेज चेकिंग हे शहरात करता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रवाशांकरिता महत्त्वाचं एअर पोर्ट असेल, अँडर ग्राऊड मेट्रो असेल कोणालाही पायी चालायला लागणार नाही. नवी मुंबईचं विमानतळ देशातील सर्वात आधुनिक एअरपोर्ट असेल. कामाची पूर्तता करण्यासाठी 30 सप्टेंबरची वेळ दिलेली आहे. सिडको आणि इतर सबंधित व्यक्तींना 30 सप्टेंबर पर्यंत दुप्पट कामगार संख्या करून हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतील त्या वेळेत करता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
























