Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकून आमचं घर फोडलं, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा गंभीर आरोप
काँग्रेसच्या माजी मंत्र्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.दबाव टाकून फडणवीसांनी घर फोडल्याचे ते म्हणालेत.
Madhukarrao Chavan on Devendra Fadnavis: काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण (Madhukarrao Chavan) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकून आमचं घर फोडल्याचे चव्हाण म्हणाले. लोकसभा निवडणुकी दरम्यान चव्हाण यांचे पुत्र आणि तुळजाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याच पार्श्वभूमीवर मधुकरराव चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे.
मधुकरराव चव्हाण हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते सध्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात संवाद मेळावा घेत आहेत. लोकसभा निवडणुकीपुर्वी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहीत पदाचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा दिला राजीनामा दिला होता.
कोण आहेत मधुकर चव्हाण?
मधुकर चव्हाण 1999 पासून सलग चारवेळा तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा मधुकरराव चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, मधुकरराव चव्हाण हे 1990 ते 1995 या दरम्यानही ते आमदार होते. 1995 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते माणिकराव खपले यांच्याकडून चव्हाणांचा पराभव झाला होता. उस्मानाबादमधूनही तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते डॉ.पद्मसिंह पाटील यांच्याकडून ते पराभूत झाले होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात काँग्रेस पंचायत समिती सदस्यापासून झाली. लोकल बोर्डाचे सभापती, भूविकास बँकेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात दुग्धविकास व पशूसंवर्धनमंत्री, विधानसभेचे उपसभापती, अशी अनेक पदे भूषविली आहेत. शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा असा त्यांचा पेहराव आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अनेक नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठवाड्यातील काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार बसवराज पाटील अशा एका मागून एक दिग्गजांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर माजी मंत्री णदुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळं आता मधुकरराव चव्हाण हे देखील प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, चव्हाण हे काँग्रेससोबत कायम राहिल्याचे पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या: