(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांबाबतही भाष्य
Devendra Fadnavis, Nagpur : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
Devendra Fadnavis, Nagpur : "मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला लवकरच आपल्याला उत्तर मिळेल. तिन्ही पक्ष मिळून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय लवकरच घेतील. आम्ही सगळे पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करत आहोत. लवकरच आपल्याला याचं उत्तर मिळेल. आधी मुख्यमंत्री ठरेल आणि मुख्यमंत्री ठरल्यानंतर ते मंत्रीपदं कोणाला द्यायची हे ठरवतील. त्यामुळे मला असं वाटतं की, आधी मुख्यमंत्र्यांची वाट पाहावी. त्यानंतर मंत्र्यांची देखील जी नावं आहेत, ती लक्षात येतील", असं भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, युतीमध्ये आम्ही सर्व एकत्रित आहोत.. शिंदे साहेब, मी आणि अजितदादा आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही... निवडणुकीच्या पूर्वी ही आम्ही सांगितलं होतं की सर्व निर्णय सोबत बसून होतील.. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून निर्णय घेतील... त्याचप्रमाणे सर्व निर्णय होणार आहे.. त्यामुळे कोणाच्याही मनात काहीही किंतु परंतु असेल तर ते ही आज माननीय एकनाथ शिंदे यांनी दूर केले आहे...
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदेंची माघार
महायुतीने विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर अजूनही मुख्यमंत्रिपदाबाबतचा सस्पेन्स कायम आहे. महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 236 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलं. भाजपने 132, शिवसेनेने (शिंदे गट)- 57, राष्ट्रवादीने (अजित पवार गट) 41 जागा मिळवल्या. त्यामुळे महाविकास आघाडीचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या आणि प्रभावी योजना राबणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रिपदाबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हेच घेतील हे जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय भाजपचाच मुख्यमंत्री होईल, हे देखील जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला होता. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादीसोबत युती करत देवेंद्र फडणवीस 4 दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, अजित पवारांसोबतचा प्रयोग फसल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अडीच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून काम करावे लागले. दरम्यान, आता देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, अशी राजकीयव वर्तुळात चर्चा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं