(Source: ECI/ABP News/ABP Majha)
साड्या देऊन आमची मतं विकत घेता का? दत्तात्रय भरणेंविरोधात महिलांचा आक्रोश, साड्या रस्त्यावर फेकल्या
Dattatray Bharne : आम्हाला विकास हवाय साड्या नको असं म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच साड्या देऊन आमची मते विकत घेता का? असा सवाल महिलांनी विचारला आहे.
Dattatray Bharne , Indapur : विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे यांचा फोटो असलेल्या पिशव्यामधून तालुक्यांमध्ये साड्यांचे वाटप करण्यात आलं. परंतु, इंदापूर तालुक्यातील कळंब या गावातील घोडके वस्तीवरील महिलांनी साड्या रस्त्यावरती फेकून दिल्या. आम्हाला विकास हवाय साड्या नको असं म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच साड्या देऊन आमची मते विकत घेता का? असा सवाल महिलांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसापासून इंदापूर तालुक्यात खेळ पैठणीच्या माध्यमातून भरणे साड्या वाटप करीत असल्याचा आरोप केला जातोय.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दत्तात्रय भरणे हे शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. " सातत्याने पाच वर्ष मी माणसांमध्ये त्यांची कामे सोडवण्यासाठी जात असतो. त्यामुळे मला टेन्शन येत नाही. मी कधीही टेन्शन घेत नाही. मला निवडणुकीची भीतीही वाटत नाही असेही आमदार भरणे यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी अजित पवार इंदापुरात दोन सभा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे लढत
महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक 2014 प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढली होती. त्यावेळी इंदापुरात राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणेंना मैदानात उतरवण्यात आलं होतं. तर काँग्रेस पक्षाकडून हर्षवर्धन पाटालांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दत्तात्रय भरणेंना 108400 मतं मिळाली होती तर हर्षवर्धन पाटलांना 94227 मतांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा जवळपास 16 हजार मतांनी पराभव झाला होता.
2019 च्या निवडणुकीत काय झालं?
2014 साली आघाडी न करता लढलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने 2019 च्या निवडणुकीत आघाडी केली. मात्र, इंदापूरची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आली. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळण्याची अडचण झाली. त्यांनी थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हर्षवर्धन पाटलांनी महायुतीकडून निवडणूक लढवली तर भरणेंनी शरद पवारांच्या राष्ट्र्वादीकडून लढवली. यावेळी दत्तात्रय भरणेंना 1 लाख 14 हजार मत मिळाली तर हर्षवर्धन पाटलांना 1 लाख 11 हजार 800 मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे जवळपास दोन हजार मतांनी पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला.
इतर महत्त्वाच्या बातम्या