Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी स्टार वक्ते सज्ज, दोन गटांची 'या' वक्त्यांवर भिस्त!
Dasara Melava : बंडखोरीनंतर शिवसेनेतल्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. या कार्यकर्त्यांसमोर विचार मांडून त्यांना कायमस्वरुपी आपल्याकडे ठेवण्याचं आव्हान दोन्ही गटातल्या वक्त्यांवर आहेत. पाहुयात कोण आहेत स्टार वक्ते आणि कोणत्या मुद्द्यांवर हे वक्ते भाषणं करु शकतात?
Dasara Melava : किशोरी पेडणेकर विरुद्ध शीतल म्हात्रे, भास्कर जाधव विरुद्ध रामदास कदम, नितीन बानुगडे पाटील विरुद्ध गुलाबराव पाटील, अरविंद सावंत विरुद्ध आनंदराव अडसूळ आणि उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे...हे आहेत दोन्ही गटाचे स्टार वक्ते यांच्यावर दसरा मेळाव्याची भिस्त असणार आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी आपल्या भात्यातली सर्व धारदार शस्त्र पारजून ठेवली आहेत. प्रतिष्ठेच्या या लढाईत एकमेकांवर बाण सोडायला दोन्ही गट सज्ज झाले आहेत. ठाकरे आणि शिंदे गटाच्या भाषेत सांगायचे झालं तर दसरा मेळाव्यात विचाराचे सोनं लुटले जाणार पण यंदाचा मेळावा हा काही वेगळाच ठरणार आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. एकेकाळचे जवळचे मित्र पक्के वैरी झाल्याने दोघांनीही एकमेकांवर तोफा डागण्यासाठी जुन्या दिवसांचा शस्त्रसाठा जमा करुन ठेवला आहे. एकाच दिवशी या लढाईला सुरुवात होणार आहे. रणांगणं वेगवेगळी असली तरी शिवतीर्थावरुन (Shivaji Park) सुटणारे बाण हे बीकेसीत (BKC) पोहोचणार आणि बीकेसीतून डागण्यात येणाऱ्या तोफांचा आवाज शिवतीर्थावर ऐकायला मिळणार अशी तयारी करण्यात आली आहे.
एकापेक्षा एक नेते दोन्ही गटांकडे आहे, ठाकरे गटाने गटप्रमुखांचा मेळावा घेऊन एकाप्रकारे नेट प्रॅक्टिक्स केली आहे तर शिंदे गटाने आपल्या भात्यातली शस्त्र राखून ठेवली आहेत. ठाकरे गटाकडून किशोरी पेडणेकर, भास्कर जाधव, नितीन बानुगडे पाटील, अरविंद सावंत, नितीन देशमुख, कैलास पाटील आणि आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे भाषणं करतील
तर शिंदे गटाची मुलुख मैदानी तोफ गुलाबराव पाटील, रामदास कदम आनंदराव अडसूळ, शंभूराज देसाई, दादा भुसे, अब्दुल सत्तारांसह इतर राज्यातील प्रमुखांना भाषण दिलं जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यांचं भाषण झाल्यावर एकनाथ शिंदेंचं भाषण होईल त्याआधी सर्व शिवसैनिकांनी चार्ज केलं जाईल.
दसरा मेळावा जरी 5 ॲाक्टोबरला असला तरी आतापासून या युद्धाला सुरुवात झाली आहे. कोण कोणावर आरोप करणार हे दोन्ही गटातल्या नेत्यांनी हे ठरवून घेतलं आहे. फुटबॉलच्या मॅचमध्ये जसं प्रत्येक खेळाडूच्या मागे खेळाडू ठेवण्याची रणनीती आखली जाते तशीच रणनीती या मेळाव्यात देखील आखली जात आहे
मागच्या काही काळात बरंच पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. सगळे एकत्र असल्याने प्रत्येकाला एकमेकांच्या कच्चा आणि पक्क्या दुव्यांची चांगलीच ओळख आहे. कुणाची नस कुठे दाबायची आणि कोणाला कसं गप्प करता येतील याचा दोन्ही गटाकडून अभ्यास केला जात आहे, माहिती काढली जात आहे, समोरच्या वक्त्यांना नामोहरम करण्याचा एकमेकांचा प्रयत्न आहे. युतीतल्या सरकारपासून ते महाविकास आघाडीतले सर्व किस्से या मेळाव्यातून बाहेर येतील.
आता या मेळाव्यात दोन्ही गटाकडून कोणत्या मुद्द्यांवर भर दिला जाईल यावर एक नजर टाकूया
- सर्वात आधी मुद्दा येईल तो हिंदुत्वाचा
- त्यानंतर मुद्दा उपस्थित केला जाईल तो गद्दारीचा
- 2014 ते 2022 पर्यंतच्या राजकारणाचा पाढा वाचला जाईल
- एवढचं काय तर सराकरच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारांची मालिकाही वाचून दाखवली जाईल
- शिवसेना ते भाजप आणि पुन्हा शिवसेना ते महाविकास आघाडीतले कधीही न ऐकलेले किस्से कानावर पडतील
- दोन्ही गटाकडून आपल्या कामांचा आढाव वाचून दाखवला जाईल
- ठाकरेंकडून मागील अडीच वर्षात केलेल्या कामांचा उजळणी केली जाईल तर नुकतेच सत्तेत आलेल्या शिंदेकडून विकास कामांचा पाढा वाचला जाईल
- ठाकरेंकडून केंद्रीय यंत्रणेवर हल्लाबोल होईल तर शिंदे गटाकडून मुंबई महापालिकेच्या यंत्रणेवर टीक केली जाईल
स्टार वक्त्यांवर भिस्त
दोन्ही गटाने दसरा मेळाव्यासाठी लागणारी साधनसामुग्री जमा करुन ठेवली आहे. दोन्ही गट दसरा मेळाव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. लाखांच्या संख्येने या दोन्ही मेळाव्यांना गर्दी केली जाईल. या उपस्थितांची मनं जिंकण्याचं मोठं आव्हान या स्टार वक्त्यांवर असणार आहे. शेवटी दोन्ही गटाला योग्य दिशा हवी आहे. आगामी काळात निवडणूक आहेत या सर्व कार्यकर्त्यांमध्ये जान भरण्याची जबाबदारी या स्टार वक्त्यांवर असणार आहे. याच स्टार वक्त्यांवर दसरा मेळाव्याची भिस्त असणार आहेत.