Dahi Handi 2022 : भाजपची दहीहंडी जांबोरी मैदानात, शिवसेनेच्या दहीहंडीची जागा ठरली!
Dahi Handi 2022 : आदित्य ठाकरे यांच्या वरळी या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित करुन भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे शिवसेना वरळीच्या श्रीराम मिलच्या चौकात दहीहंडी साजरी करणार आहे.
Dahi Handi 2022 : गोपाळकाला उत्सव दोन दिवसांवर आला असताना वरळीतल्या जांबोरी मैदानातल्या (Jambori Maidan) दहीहंडी (Dahi Handi 2022) उत्सवाची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी (Worli) या मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी आयोजित करुन भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे शिवसेना आता जांबोरी मैदानाऐवजी पर्यायी जागेवर दहीहंडीचा उत्सव साजरा करणार आहे. वरळीच्या श्रीराम मिलच्या (Shree Ram Mills) चौकात ही दहीहंडी साजरी होईल अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना (Shiv Sena)घमासान पाहायला मिळत आहे.
सचिन अहिर यांच्याकडून वरळीतील भव्य दहीहंडीला सुरु
दहीहंडी उत्सवासाठी मोठी तयारी सर्वच आयोजकांनी केली आहे. 2010 सालापासून सचिन अहिर यांनी वरळीच्या जांबोरी मैदानावर भव्य दहीहंडी उत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. याच दहीहंडी उत्सवामुळे जांबोरी मैदानला एक वेगळी ओळख प्राप्त झाली होती. मात्र यंदा जांबोरी मैदानावर शिवसेना दहीहंडी उत्सव साजरा करत नसल्याने हीच संधी साधत भाजपने या जांबोरी मैदानात दहीहंडी साजरा करण्याचं ठरवलं. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांचे निकटवर्तीय संतोष पांडे यांनी या उत्सवाचं आयोजन केलं.
खासदार अनिल देसाई यांच्याकडून वरळीतील शिवसेना नेत्यांना बोलावणं
जांबोरी मैदान हातातून गेल्यानंतर शिवसेनेकडून पर्यायी जागा शोधण्यात आली. आता वरळीतीलच श्रीराम मिलच्या चौकात शिवसेना दहीहंडी आयोजित करणार आहे. परंतु जांबोरी मैदानावर भाजपकडून दहीहंडीचं आयोजन करण्यावरुन शिवसेनेअंतर्गत घमासान झालं. शिवसेना सचिव आणि राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी वरळीतील प्रमुख शिवसेना त्यांना बोलावणं धाडलं. वरळीच्या स्थानिक शिवसेना नेत्यांची काल रात्री उशिरा या विषयावर बैठक झाली. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने दहीहंडी आयोजनात बाजी मारल्यामुळे शिवसेनेअंतर्गत घमासान पाहायला मिळत आहे.
कोणाची दहीहंडी वरचढ ठरणार?
खरंतर वरळीत शिवसेनेची ताकद आहे. या वरळी मतदारसंघांमध्ये तीन शिवसेनेचे आमदार शिवाय मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत. याच वरळी मतदारसंघांमध्ये आगामी निवडणुका लक्षात घेता भाजप ताकद वाढवण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करत आहे. कारण दहीहंडी उत्सवात एकीकडे शक्तिप्रदर्शन तर दुसरीकडे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राजकीय पक्षांकडून केला जाईल. या दहीहंडी उत्सवात भाजप आणि शिवसेना दोघांकडून सुद्धा नामांकित गोविंदा पथकांना आमंत्रित केलं जाईल, शिवाय सेलिब्रिटींचा सुद्धा गराडा असेल. त्यात कोणाची दहीहंडी वरचढ ठरते हे येत्या 19 तारखेलाच कळेल.
Dahi Handi 2022 : भाजपची जांबोरी मैदानात तर शिवसेनेची श्रीराम मिल चौकात दहीहंडी ABP Majha