Nana Patole | लोकसभेची निवडणूक लढवणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर नाना पटोलेंचे एका वाक्यात उत्तर!
महाविकास आघाडीतील तिढ्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सांगली मतदारसंघ आणि वंचित बहुजन आघाडी यावरही त्यांनी भाष्य केलं.
लोकसभा निवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्यात बैठकांचं सत्र चालू आहे. या दोन्ही आघाड्यांची आपल्या सर्व उमेदवारांची घोषणा केलेली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) भूमिकेमुळे महाविकास आघाडी अडचणीत सापडली आहे. यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेसकडून (Congress) नाना पटोले यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. याचेही स्पष्टीकरण पटोले यांनी दिले.
वंचितबद्दल नाना काय म्हणाले?
नाना पटोले यांनी माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी बोलताना त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महायुतीच्या समावेशावर भाष्य केले. आमची मित्रपक्षांशी चर्चा चालू आहे.वंचित बहुजन आघाडीसोबतही आम्ही चर्चा केली आहे. वंचितचा महाविकास आघाडीत कसा समावेश करता येईल, त्यावर चर्चा चालू आहे. आज किंवा उद्या जागावाटप तसेच उमेदवारांची नावे निश्चित होतील. आमच्या मित्रपक्षांच्या काही मागण्या आहेत. त्या मागण्यांवर तोडगा काढून पुढे जायचे आहे, असे पटोले म्हणाले.
सांगलीबाबत काँग्रेसची भूमिका काय?
सांगली या जागेबाबतही महाविकास आघाडीत तणाव आहे. आम्ही कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे आता सांगलीची जागा आमचीच आहे, असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केला जातोय. ठाकरे या जागेसाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत. तर ही जागा आमचीच असून आमचाच उमेदवार या जागेवरून निवडणूक लढवणार, अशी काँग्रेसची भूमिका आहे. यावरही पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. सांगलीबाबत आमची मित्रपक्षांशी चर्चा चालू आहे, असं ते म्हणालेत. सांगलीच्या जागेवर काँग्रेसकडून विशाल पाटील यांचा विचार केला जातोय. त्यामुळे मविआकडून नेमकं कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा लढवणार का? नाना पटोले म्हणाले....
काँग्रेस या लोकसभा निवडणुकीत धक्कातंत्राचा वापर करताना दिसतेय. त्याचाच भाग म्हणून काँग्रेसकडून नाना पटोले यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर या जागेवर तिकीट दिले जाऊ शकते. याबाबत माध्यम प्रतिनिधींनी नाना पटोलेंना बोलतं केलं. तुमची दिल्लीत जाण्याची इछा आहे का? असा प्रश्न पटोलेंना करण्यात आला. यावर बोलताना पक्षाच्या आदेशाचे सर्वांनाच पालन करावे लागते, असे पटोले म्हणाले. त्यामुळे आगामी काळात पटोले गोंदिया-भंडारा मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.