Jitesh Antapurkar: मोठी बातमी: काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
Maharashtra Politics: विधानपरिषदेच्या निवडणूकीत क्रॉस वोटिंग कारवाईच्या आधीच हिरामण खोसकर आणि जितेश अंतापूरकर पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली होती. ही शक्यता खरी ठरली आहे. दुपारी दोनला भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भोवऱ्यात असलेले काँग्रेसचे देगलूर विधानसभा मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपल्या पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. ते आता लवकरच भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि काँग्रेसचे काही आमदार हायकमांडच्या रडारवर असल्याची चर्चा होती. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाची काही मतं फुटली होती. या आमदारांची नेमकी नावं समोर आली नव्हती. मात्र, क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांच्या नावाचा समावेश होता. जितेश अंतापूरकर कधीही पक्षाची साथ सोडून महायुतीसोबत जातील, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात रंगली होती.
काही दिवसांपूर्वीच जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते. मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. ते आज दुपारी दोन वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
जितेश अंतापूरकर यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट नाकारले जाण्याच्या भीतीने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांमध्ये जितेश अंतापूरकर यांचा समावेश होता, असा काँग्रेस नेत्यांना विश्वास होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षाकडून या फुटीर नेत्यांवर कठोर कारवाई होईल, असे सांगितले जात होते. मात्र, काँग्रेस हायकमांडने या फुटीर आमदारांबाबत एक वेगळीच चाल खेळली होती. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर थेट कारवाई करण्याऐवजी त्यांना गाफील ठेवून विधानसभा निवडणुकीत तिकीट देऊ नये, असे आदेश काँग्रेस हायकमांडने स्थानिक नेतृत्त्वाला दिल्याची चर्चा होती. आगामी राजकारणातील हा धोका लक्षात घेऊनच जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केल्याचे सांगितले जाते.
काँग्रेस हायकमांडच्या रडारवर असलेले 5 संभाव्य आमदार कोण?
* सुलभा खोडके- अमरावती
* झिशान सिद्दीकी- वांद्रे पूर्व
* हिरामण खोसकर- इगतपुरी (अ.जा)
* जितेश अंतापूरकर- देगलूर (अ.जा)
* मोहन हंबर्डे- नांदेड दक्षिण
आणखी वाचा
स्वतःचे लग्नविधी टाळून आमदार थेट मुंबईत दाखल! राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गाठलं पक्ष कार्यालय
आमदार जितेश अंतापूरकर कॅमेरे बघून पळाले, धापा टाकत गाडीत जाऊन बसले, क्रॉस वोटिंगवर काय काय म्हणाले?