Nitin Raut : विदर्भ हा काँग्रेसचा गड, बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त जागा कायम ठेवण्यात आम्हाला यश; काँग्रेस नेते नितीन राऊतांचे वक्तव्य
शिवसेनेचा गड कोकण, मुंबई आहे. तसेच विदर्भ हा काँग्रेसचा गड आहे. आपल्या बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त जागा घेण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. असे वक्तव्य काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलं आहे.
Maharashtra Politics नागपूर : महाविकास आघाडीच्या चर्चेत आता स्पीड ब्रेकर राहिले नाही. फक्त एक दिवस वातावतरण तापले होते, मात्र आता सर्व योग्य दिशेने सुरू आहे. किंबहुना शिवसेनेचा गड कोकण, मुंबई आहे. तसेच विदर्भ हा काँग्रेसचा (Congress) गड आहे. आपल्या बालेकिल्ल्यात जास्तीत जास्त जागा घेण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत. सरतेशेवटी शिवसेनेसोबत सामंजस्य होईल आणि विदर्भात काँग्रेस आपल्या जागा ठेवण्यात यशस्वी होईल.असे वक्तव्य काँग्रेसचे नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
शरद पवारांची मध्यस्थीने शिवसेना-काँग्रेस वाद मिटला?
विधानसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे, विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उशीर होत आहे. त्यात, भाजपने आघाडी घेतली असून 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यानंतर, आजच अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) एकही यादी अद्याप जाहीर झाली नसून शिवसेना-काँग्रेसमध्ये काही जागांवरुन जागावाटप अडून बसल्याचं समजतंय. मात्र, शरद पवारांच्या (Sharad pawar) मध्यस्थीने अखेर काँग्रेस-शिवसेनेत हातमिळवणी झाली आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीच जागावाटपाचं गणित ठरलंय. त्यानुसार उद्या महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार असून लवकरच पहिली यादी जाहीर होईल, अशी शक्यता आहे.
विदर्भावरून काँग्रेसमध्ये घमासान?
अशातच विदर्भातील काँग्रेसचे नेते आता दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. तर ठाकरे गटही आपल्या मतावर ठाम आहे. दोघेही अडून बसल्याचं चित्र सध्या दिसत असून यांच्यातला वाद आता हायकमांडच्या दरबारात मांडला जाणार आहे. ठाकरे गटाने दावा केलेल्या 12 जागांपैकी एकही जागा काँग्रेस सोडायलाच तयार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भातील जागा सोडू नये यासाठी काँग्रेसचे नेते हाय कमांड कडे मागणी करणार असल्याचं सांगितलं जातंय. विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून आलेले काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी यांनी दक्षिण नागपूर ही आमची पारंपरिक जागा राहिली आहे. त्यामुळे काँग्रेसचा गड आमच्याकडेच राहावा, अशी मागणी त्यांनी पक्षाकडे केली आहे.
ही बातमी वाचा :