मोठी बातमी! शिंदेसेनेच्या 'या' सहा खासदारांचा पत्ता कट होणार?; भाजप हायकमांडची थेट भूमिका
Lok Sabha Election Seat Sharing : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नयेत या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
Lok Sabha Election Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) निर्णय अंतिम टप्प्यात आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांना पुन्हा उमेदवारी देऊ नयेत या भूमिकेवर भाजप हायकमांड ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या सहाही खासदारांबद्दल जनतेमधून नकारात्मक अहवाल आल्याचा दावा देखील भाजपकडून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांची (Ajit Pawar) भाजपच्या हायकमांडसोबत (BJP High Command) बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा सुटण्याची शक्यता आहे.
'या' सहा खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेमध्ये काही विद्यमान खासदारांबद्दल जनतेमध्ये नकारात्मक भूमिका पाहायला मिळाली. ज्यात शिंदे गटाचे हातकणंगलेचे धैर्यशील माने, हिंगोलीचे हेमंत पाटील, वाशिम-यवतमाळच्या भावना गवळी, उत्तर पश्चिमचे गजानन कीर्तिकर यांच्यासह इतर दोन खासदारांची नावं आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवार बदलावेत, अशी अट अमित शाह यांनी शिंदे यांना घातली आहे. आता यावर आज होणाऱ्या दिल्लीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे वृत्त 'दिव्य मराठी'ने दिले आहे.
अन्यथा पुढे चर्चा होणार नाही, भाजपची थेट भूमिका....
महायुतीची जागा वाटपाचा निर्णय घेण्यातबाबत तिन्ही पक्षातील चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मात्र, भाजपकडून काही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यास विरोध आहे. ज्या शिंदे सेनेच्या देखील काही खासदारांचा समावेश आहे. त्यामुळे या खासदारांच्या जागी इतरांना उमेदवारी देण्याची अट भाजपकडून घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या या अटीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नकार दिला असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याशिवाय चर्चा पुढे जाणारच नाही अशी थेट भूमिका भाजपने घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना आता उमेदवार बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे आज दिल्लीत होणारी जागा वाटपाची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. एकनाथ शिंदे आपले उमेदवार बदलण्याची अट मान्य करणार का? की आणखी काही निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
अजित दादांचा उमेदवार बदलणार?
आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अजित पवार गटाकडून एकूण नऊ जागा मागितल्या गेल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात अजित दादांच्या राष्ट्रवादीला तीन किंवा चार जागा मिळण्याची शक्यता आहे. परंतु, त्यातही अजित पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीतील प्रमुख नेते असलेले सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला आहे. रायगडमध्ये सुनील तटकरेंऐवजी दुसरा उमेदवार द्या अशी भाजपची सूचना आहे. त्यामुळे शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटातील विद्यमान खासदारांचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :