डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
TRUMP MEME Coin: $TRUMP मीम कॉइन 19 जानेवारी 2025 ला सोलाना नेटवर्कवर लाँच करण्यात आलं, काही तासात यामध्ये जवळपास 300 टक्के तेजी पाहायला मिळाली.
TRUMP MEME Coin न्यूयॉर्क : अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी स्वत:चं मीम कॉईन $TRUMP हे लाँच केलं. यामुळं क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली आहे. $TRUMP लाँच होताच त्याच्यामध्ये 300 टक्के तेजी आली आहे. यामुळं गुंतवणूकदार मालामाल बनले याशिवाय त्यांचा उत्साह देखील वाढल्याचं दिसून आलं.
$TRUMP लाँच होताच जोरदार तेजी
$TRUMP मीम कॉइनला 19 जानेवारी 2025 रोजी सोलाना नेटवर्क पर लाँच करण्यात आलं. याची सुरुवातीची किंमत $0.18 इतकी होती. जी काही तासांमध्येच $7.1 पर्यंत पोहोचली. या दरम्यान $TRUMP या टोकनचं मार्केट कॅप 4.25 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. काही रिपोर्ट्समधील आकडेवारीनुसार या टोकननं पहिल्या दोन तासात 4200 टक्के तेजी पाहायला मिळाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून प्रचार
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर $TRUMP मीम कॉइनचा प्रचार केला. त्यांनी त्यांच्या समर्थकांना म्हटलं की हा विजय साजरा करण्याचा वेळ आहे. माझ्या खास ट्रम्प समुदायाचे भाग व्हा, यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची जोरदार चर्चा सुरु झाली.
गुंतवणूकदार मालामाल
$TRUMP च्या लाँचिंगनंतर काही गुंतवणूकदार, क्रिप्टो समर्थकांनी मीम कॉईन खरेदीसाठी उत्साह दाखवला. ट्रेडिंग वॉल्यूम जवळपास $1 अब्जपर्यंत पोहोचलं होतं. यामुळं बाजारातील यासंदर्भातील आकर्षण पाहायला मिळालं. काही गुंतवणूकदारांनी याबाबत सवाल देखील उपस्थित केले.
डोनाल्ड ट्रम्प यांचं क्रिप्टो धोरण काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणुकीच्या अभियानावेळी क्रिप्टोकरन्सीबाबत सकारात्मकता दाखवली होती. त्यांनी क्रिप्टो प्रेसिडेंट होण्याचं आश्वासन दिलं होतं. आपल्या आगामी कार्यकाळात क्रिप्टो उद्योगाला प्रोत्साहन देण्याचं नियोजन केल्याचं त्यांनी म्हटलं. सूत्रांच्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर क्रिप्टो सल्लागार परिषद स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता.
सतर्कतेची गरज
$TRUMP मीम कॉइननं सुरुवातीच्या टप्प्यात यश मिळवलं असलं तरी क्रिप्टोकरन्सी अनेकदा अस्थिर असतो. मीम कॉइन्स गंमत म्हणून सुरु होतात. अनेकदा लोक याला खरेदी करत नाहीत. नंतरच्या काळात त्याला खरेदीदार मिळत नाहीत. त्यावेळी किंमत घसरू शकते. गुंतवणूकदारांनी सतर्कतेनं गुंतवणूक करणं आवश्य आहे.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)