CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रचाराचा धडाका! नागपूर, रामटेकमध्ये जाहीर सभा; मात्र प्रचारावर पावसाचं सावट
CM Eknath Shinde Sabha : महायुतीचे स्टार प्रचारक कामाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री आज जाहीर सभा घेणार आहेत.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. यासाठी सर्व पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूर, रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी हजेरी लावणार आहे. महायुतीचे स्टार प्रचारक कामाला लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. मुख्यमंत्री आज जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक येथे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका
पाहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मोठ्या सभांचा धडाका आज पाहायला मिळणार आहे. दिग्गज नेते मंडळीच्या आज सभा पार पडणार आहे. मात्र, एकीकडे सभांचा उत्साह असला तरी सभांच्या गराड्यावर पावसाचं सावट दिसून येत आहे. पूर्व विदर्भातील पाच लोकसभेच्या जागांसाठी मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आजपासून होणार आहे. आज रामटेक आणि नागपूर लोकसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत.
महायुतीकडून जोरदार प्रचार
दरम्यान, आज संध्याकाळी नागपूर लोकसभा मतदारसंघात दक्षिण-पश्चिम विधानसभा परिक्षेत्रात भाजपा लोकसभा उमेदवार नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांची प्रचार यात्रा निघणार आहे. तर उद्या चंद्रपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याकरता प्रचार सभा होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी या आदित्यनाथ यांची 8 एप्रिलला नागपूर, वर्धा आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सभा घेणार
एवढंच नाही तर, योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीही महाराष्ट्रात सभा घेणार आहे. 10 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक लोकसभा मतदारसंघात कन्हान येथे सभा घेणार आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी 13 एप्रिलला भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेतील. प्रियंका गांधी काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ 15 एप्रिलला चंद्रपूर येथे पोहोचणार आहे. दरम्यान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे 14 एप्रिलला नागपुरात असतील.
प्रचार सभांवर पावसाचं सावट
पुढची पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे सावट असून काही जिल्ह्यासाठी तर नागपूर वेध शाळेने ऑरेंज अलर्ट दिला असल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. नागपूर वेध शाळेने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आज उद्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पुढच्या तीन दिवसासाठी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.