(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेची ठाण्यात भेट न झाल्याने भुसे-सामंत-गोडसे ताटकळत, श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून गोडसे नाशिकला रवाना
Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले राज्याचे मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि हेमंत गोडसे हे वाट पाहून शेवटी निघून गेले.
ठाणे: शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीची दुसरी यादी (Shiv Sena Candidate List) जाहीर होण्यापूर्वी अनेक नाट्यमय घडोमोडी घडत असल्याचं दिसतंय. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दादा भुसे, उदय सामंत, हेमंत गोडसे हे जमा झाले असताना मुख्यमंत्री वेळेत न पोहोचल्याने त्यांना ताटकळत बसावं लागलं. शेवटी दोन तासांनी दादा भुसे, उदय सामंत आणि हेमंत गोडसेंनी ठाण्यातून काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांची भेट न मिळाल्याने वैतागलेले हेमंत गोडसे नाशिकला निघून गेले तर उदय सामंत, दादा भुसे आणि इतर नेते मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
श्रीकांत शिंदेंशी चर्चा करून नेत्यांचा काढता पाय
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांची भेट घेण्याच्या निमित्ताने आलेले शिवसेना नेते दादा भुसे आणि सुहास कांदे दोन तासांपासून प्रतीक्षेत होते. तर एका तासापासून किरण सामंत आणि उदय सामंत प्रतीक्षेत होते. नंतर हेमंत गोडसे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले, पण त्यांनाही मुख्यमंत्र्यांची भेट होऊ शकली नाही. शेवटी श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हेमंत गोडसे पुन्हा नाशिकला गेले. शुक्रवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नेमके कुठे गेले होते याचा पत्ता त्यांच्या विश्वासू नेत्यांनाही नव्हता.
उदय सामंत, दादा भुसे, हेमंत गोडसे परत गेले
दादा भुसे, सुहास कांदे, किरण सामंत, उदय सामंत असे अनेक नेते ठाण्यातील त्यांच्या घरी जमले होते. मात्र मुख्यमंत्री कधी येणार हे कोणालाही माहिती नव्हतं. त्यामुळे या सर्व नेत्यांनी दोन तास वाट पाहून शेवटी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतले. तर दादा भुसे, सुहास कांदे यांनी त्यानंतर काही वेळ वाट पाहिली. पण मुख्यमंत्री वेळेत पोहोचले नसल्याने या नेत्यांनी आपली वाट धरली.
हेमंत गोडसेंची उमेदवारी धोक्यात?
शिंदेंच्या शिवसेनेने त्यांचे आठ उमेदवार जाहीर केले असून आणखी चार ते पाच ठिकाणच्या उमेदवारांची नावं घोषित होणं बाकी आहे. त्यापैकी सर्वात मोठा वाद होतोय तो नाशिकच्या जागेवरून. नाशिकमध्ये सेनेचे खासदार हेमंत गोडसे हे असून त्यांच्या विरोधात भाजपच्या आमदारांनी मोर्चा उघडला आहे. तसेच साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या अजितदादांना देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचं बोललं जातंय. त्यासाठी हेमंत गोडसेंनी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी संध्याकाळीही ते याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदंच्या भेटील आलेले.
सिंधुदुर्गातून किरण सामंत आग्रही
दुसरीकडे सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेदेखील आग्रही आहेत. भाजपने या मतदारसंघावर दावा केला असून त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्याच वेळी हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार देण्यात यावा अशी मागणी उदय सामंत यांनी केलीय. रायगड राष्ट्रवादीला सोडल्यानंतर कोकणातील दुसरा मतदारसंघ तरी आपल्याकडे राहावा यासाठी उदय सामंत प्रयत्नशील असल्याने ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते.
ही बातमी वाचा: