गृह खात्याऐवजी भाजपकडून एकनाथ शिंदेंना 3 पर्याय; शिवसेना तोडीस-तोड खात्यासाठी आग्रही
गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यापुढे 3 पर्याय देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : भाजप नेत्यांनी विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स संपला. मात्र, शपथविधी सोहळ्यापर्यंत शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली की नाही, याची चर्चा होती. अखेर त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मात्र, आता गृह खाते शिवसेनेला मिळणार की देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष गृह खात्यासाठी आग्रही आहेत. तर, भाजपकडून एकनाथ शिंदेंना (Eknath Shind) गृह खात्याऐवजी 3 खात्यांचा पर्याय देण्यात आल्याची माहिती आहे. गृह खात्याच्या तोडीस तोड असलेल्या खात्याची निवड शिवसेना शिंदे गटाला करायची आहे. त्यामुळे, शिवसेनेपुढे मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसून येते.
गृहमंत्रालयाच्या बदल्यात एकनाथ शिंदे यांच्यापुढे 3 पर्याय देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये, महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन खात्यांचा शिवसेनेकडूनही विचार सुरु आहे. शिवसेनेला 3 खात्यांच्या पर्यांयांपैकी 1 पर्याय निवडावा लागणार आहे. मात्र, गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीस तोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही आहे. मात्र, ऊर्जा आणि गृहनिर्माण खाते शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, वरील 3 पर्यायांपैकी एक खाते शिंदे गटाच्या वाट्याला येऊ शकते, त्यामध्ये महसूल हे वजनदार खातं आहे. गत महायुती सरकारमध्ये महसूल खाते भाजपकडे होते, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे या खात्याची धुरा होती. तर, सार्वजनिक बांधकाम हेही खाते भाजपकडेच होते. मात्र, मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. मात्र, भाजप देखील गृह खातं सोडायला तयार नाही.
गृहखात्यावर फडणवीसांनी काय म्हटलं
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली. त्यावेळी बोलताना त्यांनी गृहखात्यावर स्पष्टपणे भाष्य केलं. गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यामुळे, गृहखात्याचा सस्पेन्स कायम आहे. मात्र, दिल्लीतील केंद्रीय गृहखात्याचा व राज्यातील गृहखात्याचा समन्वय चांगला होण्यासाठी ते खातं आमच्याकडेच असेल तर चांगलं असेही फडणवीस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.