मोठी बातमी! औरंगाबादमधील 3 मतदारसंघात एक लाखाहून अधिक बोगस नावं? चंद्रकांत खैरेंची तक्रार, एमआयएमने दुबार मतदान केल्याचा आरोप..
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरेंनी एमआयएमवर गंभीर आरोप केले असून औरंगाबादच्या ३ मतदारसंघांमध्ये बोगस नावं असल्याची तक्रारही त्यांनी दाखल केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येतेय. छत्रपती संभाजीनगरमधील नव मतदार संघांपैकी 3 मतदारसंघात 1 लाख बोगस नावं असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमने दुबार नावांसह बोगस मतदान केल्याचा आरोपही केलाय. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांचीही त्यांनी यासंदर्भात भेट घेतली आहे. ज्यांनी दोनदा मतदान केलंय त्यांच्या वर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून १ लाखाहून अधिक मतदारांची दुबार नोंदणीच नाही तर दोन वेळा मतदान झाल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं. विधानसभा निवडणूक अवघ्या दोन ते तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना खैरेंच्या तक्रारीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बोगस मतदार तपासण्याची मोहिम
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन नव मतदारसंघांमध्ये तब्बल एक लाखांहून अधिक दुबार नावं असल्याचे तक्रार केलीये. औरंगाबाद पूर्व, मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात एक लाखांहून अधिक बोगस नावं असून शहरातल्या, गावखेड्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात सारखीच नावं अससून वंचित आणि अन्य पक्षांकडूनदेखील तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून बोगस नावं तपासण्याची मोहीम सुरु असून मतदारांनी स्वत:हून दुबार नावं कमी करावीत असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं असून ठराविक कालावधीत नाव कमी न केल्यास गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी एबीपी माझा' ला दिली.
चंद्रकांत खैरेंचा एमआयएमवर दुबार मतदानाचा आरोप
छत्रपती संभाजीनगरच्या ३ मतदारसंघात १ लाखांहून दुबार नावं असून एमआयएमने दुबार मतदानही केल्याचा आरोप खैरेंनी केला. "याआधीसुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन मी निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. त्यांनी त्यावेळेसचे जिल्हाधिकारी चौधरी यांना पत्र दिलं होतं. त्यांनीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे एकाच घरातल्यांची चार चार ठिकाणी नावं आली. मतदान झालं. पण यावेळी कोणत्याही परिस्थितीत याद्या दुरुस्त करा. दोन्हीकडं मतदान करणं गुन्हा आहे", असे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
कुठे आहेत तक्रारी?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ९ मतदारसंघ असून तीन मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार करण्यात आली आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, आणि औरंगाबाद पश्चिम या तीन मतदारसंघामधून दुबार नावांच्या तक्रारी समोर आल्या असून औरंगाबाद मध्य मतदारसंघांमधून 3 तक्रारी आल्या आहेत. यानुसार मध्य मतदारसंघात 32 हजार दुबार नावे असल्याचे सांगण्यात आलंय. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 34 हजार दुबार नावं तर औरंगाबाद पश्चिम आलेल्या तक्रारीत 22 हजार दुबार नाव असल्याचा आरोप करण्यात आलाय. ठाकरे गटाच्या राजू शिंदेंच्या फुलंब्री मतदारसंघातून ३ तक्रारी आल्या असल्याचं सांगण्यात येतंय.