Chhagan Bhujbal : कटुता संपवण्याचं पहिलं पाऊल.., छगन भुजबळ शरद पवार भेटीबद्दल राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?
Sharad Pawar Chhagan Bhujbal Meet : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या भेटीत नेमकं काय घडणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भेट घेतली. काल शरद पवारांवर घणाघाती टीका केली आणि आज छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी रवाना झाले. या भेटीबद्दल राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी या भेटीचं विश्लेषण केलं आहे.शरद पवार आणि छगन भुजबळ यांची ही भेट पक्षाच्या वतीनं असेल असं वाटत नाही. दोन्ही गटांकडून एकत्र येण्याबाबत काही चिन्ह दिसत नाही. शरद पवारांबाबत छगन भुजबळ यांची भूमिका सौम्य झालेली आहे. मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्याकडून हे पाऊल उचलण्यात आलंय का? असं अभय देशपांडे म्हणाले. छगन भुजबळ यांच्याकडून कटुता कमी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असू शकतं.
सर्वपक्षीय बैठकीला विरोधक आलेले नाहीत हा मुद्दा सत्ताधारी पक्षानं विधिमंडळात आक्रमकपणे मांडला धरला होता. एक दिवसासाठी सभागृह तहकूब करावं लागलं होतं. या प्रश्नात ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही यावर सत्ताधारी पक्षाची कोंडी झाली होती. या परिस्थितीत सर्वपक्षीय बैठक घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा होता. त्या बैठकीला विरोधक आले नाहीत हा मुद्दा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला जातोय.बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलवावं असं पत्र लिहिलं होतं. मग, पुन्हा विरोधकांनी या बैठकीला येणं का टाळलं, असा सवाल सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत होता. आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांची भूमिका ओबीसी मराठा आरक्षणावर दुटप्पी असल्याचं अधोरेखित करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं.
अजित पवार गटाचे उन्मेष पाटील काय म्हणाले?
छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार हे देखील राज्यातील आणि देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ यांना कुणाला भेटायला जायचं असल्यास परवानगी घेण्याची गरज नाही. आम्ही वेगळा निर्णय घेतला तेव्हा त्या निर्णयाच्या सर्व प्रक्रियेवेळी शरद पवार यांच्यासोबत सल्लामसलत झाली होती. शरद पवार यांच्याबाबत आमच्या कुठल्या नेत्याच्या मनात कटुता नाही. शरद पवार यांना भेटायला छगन भुजबळ गेले आहेत याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.
आम्ही महायुतीत आहोत ते महाविकास आघाडीत आहेत. राजकीय क्षेत्रात आम्ही वेगवेगळ्या बाजूला असल्यानं टीका टिप्पणी होत असते. शरद पवार यांना छगन भुजबळ हे भेटायला गेल्यानं त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी म्हटलं.