Chhagan Bhujbal : छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आजच मोठा निर्णय घेणार?, अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं
Chhagan Bhujbal Meet Devendra Fadnavis : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
मुंबई : मंत्रिमंडळात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना डावलण्यात आल्याने ते कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात माझ्या समावेशासाठी आग्रही असल्याचे वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केले आहे. यानंतर आज छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होताच छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ते तातडीने नाशिकला रवाना झाले होते. जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. छगन भुजबळांच्या नाराजीचे पडसाद राज्यभरात उमटले. अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानाबाहेर देखील ओबीसी समाजाकडून आंदोलन करण्यात आले. नाशिकमधील कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. नाशिक आणि येवल्यात समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट हल्लाबोल केला होता. यानंतर छगन भुजबळ मुंबईमध्ये रवाना झाले. मुंबईमध्ये रविवारी (22 डिसेंबर) ओबीसी बहुजन आघाडीची बैठक झाली. या बैठकीत छगन भुजबळांना पाठिंबा देण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी केला.
छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार?
यानंतर छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे कुठला वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
छगन भुजबळांचा अजित पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, काल छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. मी लोकसभेची तयारी केली होती. पण त्यावेळी मला थांबवण्यात आले. त्यानंतर राज्यसभेच्या दोन जागांवर संधी होती. पण त्यावेळीही मला तुमची राज्यात गरज आहे असं सांगत थांबवण्यात आले. मग आता गरज संपली का? मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्यासाठी आपल्याला थांबवण्यात आल्याचं म्हटलं जातंय. पण तरुणपणाचे वय काय आहे? तरुणांना संधी द्या पण काही जागा सिनिअर लोकांसाठी ठेवायला हव्यात ना. आधीच सांगायचं ना विधानसभेला उभे राहू नका. राज्यसभेवर जा म्हणणे म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. मग उभे केलंच कशाला? असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या