Chhagan Bhujbal: माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना का केली? भुजबळांचा दादांना सवाल!
Chhagan Bhujbal: माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना का केली असा सवाल उपस्थित करून पुन्हा आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
नाशिक: महायुतीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना या मंत्रीमंडळातून वगळलं आहे, त्यामुळे ते नाराज झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यानंतर त्यांनी हिवाळी अधिवेशन सोडून आपल्या मतदारसंघात परत गेले. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, माझ्या मंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आग्रही होते, प्रश्न मंत्रिपदाचा नाही, अवहेलना का केली असा सवाल उपस्थित करून पुन्हा आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
मंत्रिपद कोणी नाकारलं
आज कार्यकत्यांची बैठक झाल्यानंतर भुजबळांनी (Chhagan Bhujbal) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावं लागेल. प्रत्येक पक्षाचा निर्णय हा त्या पक्षाचा प्रमुख घेत असतो. भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, तसं शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. तसंच आमच्या पक्षाचा निर्णय अजित पवार घेतात. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, ज्याप्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याचा आहे, असंही छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत.
मला जे काही कळलं आहे, त्यावरून माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी मुख्यमंत्री आग्रही होते त्यांनी आग्रहा धरला होता ते देखील मी निश्चित कन्फर्म करून घेतला आहे. मंत्रीपद कोणी नाकारलं हे शोधावे लागेल असेही ते यावेळी म्हणालेत.
त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली..
लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हा देखील मी शांत बसतो. मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे आहे. मात्र, आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, असं म्हणत छगन भुजबळ यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.
पण आता मी निवडणूक लढलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी जीव काढला. मी त्यांना काय सांगू? मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असं सांगितलं होतं. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.