Buldhana News : अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल, शिवरायांविरोधातील वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाड यांचा इशारा
Buldhana News :छत्रपतींचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.
Buldhana News : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यभरात वादंग उठलं आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. त्यातच आता सत्ताधारी शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी देखील राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि भाजपचे नेते सुधांशू यांच्यावर हल्लबोल केला आहे. छत्रपतींचा वारंवार अपमान होत असेल तर हे चांगलं नाही. अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे. ते बुलढाण्यात बोलत होते.
'राज्यपालांकडून सातत्याने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख'
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना संजय गायकवाड म्हणाले की, "शिवछत्रपतींचा इतिहास कधीही जुना होत नाही. त्यांची तुलना जगातील कोणत्याही महापुरुषाशी करता येत नाही. राज्यपाल सातत्याने शिवरायांचा उल्लेख शिवाजी असा एकेरी करतात. ते यापूर्वी सुद्धा अनेक वेळा त्यांनी छत्रपतींबद्दल बोलले आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांना विनंती आहे की, ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहिती नाही, अशा राज्यपालांना खुर्चीवर ठेऊन काही फायदा नाही. मराठी मातीतला माणूसच या ठिकाणी हवा. त्यामुळे या राज्यपालांना कुठे नेऊन घालायचे तिथे पाठवा."
'अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल'
तर आमदार संजय गायकवाड यांनी भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशू त्रिवेदी यांचा देखील समाचार घेतला. "शिवाजी महाराज होते म्हणून हा महाराष्ट्र आहे. राज्यपालांनी, भाजपच्या लोकांनी विचार करुन छत्रपतींच्या बाबतीत बोललं पाहिजे. अशाप्रकारचा अपमान आम्ही सहन करणार नाही. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगलं नाही, अन्यथा एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आणि त्याचे परिणाम दोघानांही भोगावे लागतील," असा इशाराही गायकवाड यांनी दिला.
राज्यपाल काय म्हणाले होते?
औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद सुरु झाला. "आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातच ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय," असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असंही कोश्यारी म्हणाले होते.
सुधांशू त्रिवेदी यांचं वादग्रस्त वक्तव्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. "छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला पत्र लिहून पाच वेळा माफी मागितली होती," असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं होतं.