पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
लोकसभा निवडणुकीत पडलेल्या सातारा या जागेवरील उमेदवारांच्या पराभवाला पिपाणी हे अपक्ष उमेदवाराचे चिन्हच कारणीभूत असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालात यंदा महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) सर्वाधिक 30 जागा जिंकल्या असून महायुतीने केवळ 17 जागांवरच विजय मिळवला. मात्र, निवडणुकांची रणनिती, प्रचार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या पराभवासाठी डावपेच आखताना अनेकांनी आपल्या निवडणूक चिन्हाशी मिळते-जुळते चिन्ह देऊन उमेदवार उभे केल्याचं पाहायला मिळालं. अर्थातच काही उमेदवारांना याचा मोठा फटका बसला असून अनेकांचे सीट धोक्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन मतदारसंघात याचा फटका बसला असून सातारा (Satara) आणि दिंडोरी मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांच्या पराभवाला पिपाणी हे चिन्हच कारणीभूत असल्याचं राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळाला आहे. मात्र, पडलेल्या सातारा या जागेवरील उमेदवारांच्या पराभवाला पिपाणी हे अपक्ष उमेदवाराचे चिन्हच कारणीभूत असल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच उमेदवारांना पिपाणी या अपक्ष उमेदवारांच्या उमेदवारीचा फटका बसला आहे. सरासरी 45 ते 50 हजारांचं मतदान या पिपाणी या चिन्हाने घेतले आहे, विशेष म्हणजे पिपाणी या चिन्हाचं नाव तुतारी ठेवण्यात आलं , त्यामुळे हा घोळ झाल्याचं जयंत पाटील यांनी म्हटले. विशेष म्हणजे दिंडोरी आणि सातारा लोकसभा मतदारसंघात याचा मोठा फटका बसल्याचं त्यांनी सांगितलं.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे यांचा 1 लाख 13 हजार 199 मतांनी विजय झाला आहे. मात्र, येथील अपक्ष उमेदवार बाबू भगरे (सर) यांच्या पिपाणी या चिन्हासमोरील बटण दाबल्याने त्यांना 1 लाख 3 हजार मतं मिळाली आहेत. मात्र, पिपाणीचं नाव तुतारी ठेवल्यानेच हा घोळ झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. तर, सातारा लोकसभा मतदारसंघातही पिपाणी चिन्ह घेऊन निवडणूक लढलेल्या अपक्ष उमेदवारास 37 हजार 62 एवढी मतं पडली आहेत. तर, येथील विजयी उमेदवाराचे मताधिक्य 32 हजार 771 एवढे आहे. त्यामुळे, साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पराभवास पिपाणी हे चिन्ह कारणीभूत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. तसेच, यासंदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचेही जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.
सुप्रिया सुळेंचाही तोच दावा
"जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याचीही सीट आली असती. दिंडोरीतही पिपाणीला मतं पडली आहेत. हा रडीचा डाव आहे, दुसरं काही नाही. मी दहा वर्षे भाजपचं सरकार पाहिलं आहे", असं बारामतीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. बारामती लोकसभेत विजय मिळवल्यानंतर सुप्रिया सुळेंनी दौंडमध्ये जात लोकांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीबाबत भाष्य केलं, यावेळी त्यांनी निवडणूक उमेदवारांचे चिन्ह असलेल्या पिपाणी व तुतारी ह्यावर भाष्य केलं.