तू कधी येणार, वेळ व तारीख सांग; भाजपच्या मुस्लिम नेत्याचा नितेश राणेंना इशारा, झळकले बॅनर्स
मुस्लिम समाजाबद्दल नितेश राणे यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायानेही जोरदार विरोध सुरू केला आहे.
मुंबई : नाशिकच्या सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप आमदार नितेश राणे यांनी विविध जिल्ह्यात मोर्चे काढून भाषण केले. यावेळी, भाषण करताना त्यांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. विशेष म्हणजे मी हिंदूंचा गब्बर असून मी चालायला लागलो तर लोकं दारं बंद करतात, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हिरवा साप म्हणत ते मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असल्याचेही पाहायला मिळते.सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने आणि गृहमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आता, भाजपच्याच मुस्लीम नेत्यांनी नितेश राणेंवर हल्लाबोल केलाय. तसेच, तू वेळ आणि तारीख सांग, मी इथेच आहे, अशा शब्दात इशारादेखील दिला आहे.
मुस्लिम समाजाबद्दल नितेश राणे (Nitesh Rane) यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या वक्तव्यानंतर मुस्लिम समुदायानेही जोरदार विरोध सुरू केला आहे. आता, भाजपमधील (BJP) मुस्लिम (Muslim) नेत्यांनी ही त्यांच्यावर जहरी टीका करायला सुरुवात केली आहे. भाजप नेते हाजी अरफात शेख यांच्या घराबाहेर नितेश राणे यांच्यावर टीका करणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. नितेश राणेंनी कुर्ल्याच्या मशिदीमध्ये यावे, असे चॅलेंजच त्यांना शेख यांनी दिलंय. तसेच, आपण भाजप नेत्यांकडे तक्रार केली असून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. जर राणे असेच बोलत राहिले तर आपण भाजपमध्येच राहून त्यांना उत्तर देत राहणार असल्याचेही हाजी अराफत शेख यांनी म्हटले.
वेळ अन् तारीख सांग
मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुर्ल्यामध्येच आहे, तू कधी येणार आहे वेळ व तारीख सांग. तू मस्जिदमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो, ते सोड कुर्ल्याच्या मस्जिदमध्ये येऊन तर दाखव, अशा शब्दात हाजी अराफत शेख यांनी आमदार नितेश राणेंना इशारा दिला आहे. तसेच, यापुढे माझ्या धर्माबद्दल व धर्मगुरूबाबत बोलला तर याद राख, असेही शेख यांनी म्हटले.
काँग्रेसकडून पोलिसांना निवेदन
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही मुंबई पोलीस आय़ुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, माजी आमदार विरेंद्र बक्षी, सचिन सावंत, संदीप शुक्ला आणि आदी उपस्थित होते. राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे षडयंत्र दिसत असून जाणीवपूर्वक चिथावणीखोर विधाने केली जात आहेत. माझे बॉस सागर बंगल्यावर राहतात मला कोणी काहीही करु शकत नाही अशा वल्गणा आमदार नितेश राणे यांनी मध्यंतरी केली होती. नितेश राणेंनी सातत्याने प्रक्षोभक विधाने करुनही त्यांच्यावर कारवाई होत नाही यावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांना अभय आहे हे स्पष्ट दिसत आहे, असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते.
काय म्हणाले होते नितेश राणे
माझा इतिहास सर्वांना माहिती आहे. दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबीय आहे. बाकी कोणातच हिंमत नव्हती. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काऊंटर करण्याचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मी मुलगा आहे. हिंमतीने सर्व करा, कुणी काय इथे करू शकत नाही. आपल्या जिभेला काही हाड नाही. पाहिजे तेव्हा मी बोलतो त्यांच्यासमोर मी जाऊन बोलतो मला पाहून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे हे लक्षात ठेवा, असे वक्तव्य नितेश राणे यांनी अहमदनगर येथील मोर्चात केले होते.