मोठी बातमी! काँग्रेसचा भाजपला धक्का, गडकरींच्या मित्राचा पुतण्या फोडला; अभ्युदय मेघे काँग्रेसमध्ये
भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षात स्वागत केलंय.
वर्धा : लोकसभा निवडणुकानंतर आता विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांसाठी राजकीय पक्ष कामाला लागेल असून यंदा महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे, गतवेळेसच्या तुलनेत यंदा जागावाटपात सर्वच पक्षांच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे, जागावाटपानंतर विधानसभा निवडणुकीत मोठी बंडखोर होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते दिल्लीत एकत्र येऊन विधानसभा निवडणुकांची रणनीती आखत आहेत, दुसरीकडे राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून पक्षात येणाऱ्यांचं स्वागत केलं जात आहे. भाजप नेते आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अभ्युदय मेघेंचं पक्षात स्वागत केलंय.
राज्यात काका-पुतण्यांचं राजकारण चांगलंच चर्चेत आहे, बारामतीमधील पवार कुटुंब असो, बीडचं मुंडे कुटुंब असो किंवा नुकतेच आपल्या पुतण्यासाठी निवडणुकांच्या राजकारणातून राजकीय संन्यास घेतलेले प्रकाश सोळंके असो. काका-पुतण्याचा वाद किंवा काका विरुद्ध पुतण्या निवडणुकांच्या रणांरगणात हे चित्र पाहायला मिळत आहे. आता, काँग्रेसनेही एक पुतण्या फोडला असून भाजपा धक्का दिलाय.
काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले अभ्युदय मेघे हे भाजप नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे आहेत. मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आज त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये वर्धा विधनासभा मतदारसंघातून उमेदवारीकरिता त्यांनी अर्ज सादर केल्याची माहिती आहे. विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातुन अभ्युदय मेघे यांचा जनसंपर्क असून अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे ते अध्यक्षही आहेत. अभ्युदय मेघे यांच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, अभ्युदय यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आल्यास पक्षातील इतर इच्छुक उमेदवारांचं काय होणार, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दत्ता मेघे कोण ?
दत्ता मेघे हे राज्यातले ज्येष्ठ नेते असून ते काँग्रेसच्या तिकीटावर चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. काँग्रेसच्याच तिकीटावर ते राज्यसभेवर गेले नंतर भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आजही ते भाजप सदस्य असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे चांगले मित्र आहेत. आपल्या मृत्युपत्रात कुठं काही घोळ होऊ नये, कसलीही अडचण येऊ नये याकरिता दत्ता मेघे यांच्या मृत्युपत्रात नितीन गडकरी यांचं नाव लिहिलं असल्याचं गुपित खुद्द माजी खासदार दत्ता मेघे यांनीच जाहीररीत्या एका कार्यक्रमात उघड केलं होतं.
हेही वाचा
राज ठाकरेंचा खांद्यावर हात, भाजप विरोधात बंडू कुटे मैदानात; मनसेचा चौथा उमेदवार जाहीर