Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांचे आधी गंभीर आरोप, मात्र अजित दादांच्या भेटीनंतर म्हणाले मी वाल्मिक कराडांचं नाव घेतलं नाही
Suresh Dhas : बीड आणि परभणी प्रकरणी आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
Suresh Dhas On Massajog Crime नागपूर : बीड आणि परभणी प्रकरणी आज सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी बीड प्रकरणात गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सुरेश धस यांनी ज्यांच्यावर आरोप केले तो व्यक्ती अजित पवारांच्या पक्षातील एका मंत्र्यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्यावर बीड प्रकरणात गंभीर आरोप केला होता. मात्र आता बोलताना सुरेश धस म्हणाले की, मी अद्याप वाल्मिक कराड यांच नाव घेतलेलं नाही. माझी पोलिसांना विनंती आहे की पोलिसांनी तत्काळ चौकशी करून आरोपी आणि त्यांचे आका कोण आहेत हे उघड करावे. यासाठी मी अजित पवारांची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याची स्पष्टोक्ती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
मी अद्याप वाल्मीक कराडांचं नाव घेतलं नाही- सुरेश धस
मराठवाड्यात आणि विशेषता बीड जिल्ह्यात पिक विमा योजनेत मोठा गोंधळ झाला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी गुन्हा दाखल झाला आहे. तसेच बीड जिल्ह्यामध्ये साडेसात हजार हेक्टर सरकारी जमीन, गायरान जमिनी, मांजरा प्रकल्पाच्या जमिनी इत्यादी सरकारच्या जमिनीवर पिक विमा भरून जवळपास सात हजार हेक्टरचा विमा उचलला आहे. धाराशिव जिल्ह्यात तीन हजार हेक्टर वरील असाच प्रकार झाला असून या प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहे. मात्र एकही आरोपी त्यात अटक नाही. हा महाघोटाळा माझ्या हाती लागला असून त्याची एक प्रत मी अजितदादांना द्यायला आलो होतो. तसेच या संदर्भातली आणखी एक प्रत मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असून याप्रकरणी चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली.
संतोष देशमुख प्रकरणातील आका शोधला पाहिजे
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दहा दिवस उलटून गेले आहेत. अद्याप कठोर कारवाई कुणावरही झाली नाही. याप्रकरणी एसआयटी नेमून जलद गतीने कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत असेही ते म्हणाले. वाल्मीक कराड यांचे अद्यापपर्यंत मी नाव घेतलेले नाही. विष्णू चाटे आणि इतर सहा आरोपींच्या बद्दल मी बोललो आहे. त्यांचा आका कोण हे शोधून काढलं पाहिजे. अजितदादांच्या कानावर ही गोष्ट मी घालण्यापेक्षा त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य माहिती आहे. संतोष देशमुख यांचा दशक्रिया चा कार्यक्रम आज आहे. आज एसआयटी स्थापन होऊन चौकशी जलद गतीने व्हावी अशी आमची मागणी आहे. असेही सुरेश धस म्हणाले.
पिएसआय पाटीलला सहआरोपी करा- सुरेश धस
मी मुख्यमंत्र्यांस पत्र देणार आहे की, यात पीएसआय पाटील, ठाणे अमलदार बनसोडे आणि पीआय यांना सहआरोपी करा, अशी मागणी मी करणार आहे. गृह खात्याने आधी सीआयडी नेमली, आता त्यांची टीम पुण्यावरून जाऊन कसा काय तपास करू शकेल. आज संतोष देशमुख याचा दहावा आहे. माझी मागणी आहे आजच्या आज एसआयटी स्थापन झाली पाहिजे. सध्या जो सोशल मीडियात आरोपीचा आणि संतोष देशमुख याचा भावाचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओ बाबत माहिती अशी आहे की, पीएसआय पाटील ने संतोष देशमुखच्या भावाला बोलावून घेतलं होतं आणि किरकोळ वाद मिटवून घ्या, असं सांगत होता. माझी स्पष्टपणे मागणी आहे पिएसआय पाटीलला सहआरोपी करा, मी सत्तात्यान म्हणतोय आका कोण आहे याचा शोध घ्या, असेही सुरेश धस म्हणाले.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण काय?
केज (Kej) तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुखांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून खून करण्यात आला. संतोष देशमुख व त्यांचा आतेभाऊ हे चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगावजवळ दोन वाहनातून येऊन अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवली. त्यानंतर संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे अपहरण करण्यात आलं.
याबाबत केज पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या धनंजय देशमुखांना तीन तास ताटकळत ठेवण्यात आलं. पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. मात्र काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात संतोष देशमुखांना जबर मारहाण केल्याचं त्यांच्या शरिरावरील घावांवरून दिसून आलं.
या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली असून त्यावरून आता राजकारणही तापलं आहे. ही हत्या पवनचक्की खंडणी प्रकरणातून झाल्याची चर्चा आहे. या पवनचक्की खंडणी प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा