Maharashtra Assembly Election 2024: लोकसभेच्या निकालापासून धडा घेतला, भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी जागांचा आकडा ठरवला, 180 जागा लढवणार?
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीला भाजपने 170 जागांवर निवडणूक लढवल्यास शिंदे गट आणि अजितदादा गटाची मोठी कोंडी होऊ शकते. शिंदे गटाला 100 जागा लढवायच्या आहेत. मात्र, आता हा आकडा कमी होऊ शकतो.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने 170 ते 180 जागा लढण्याची रणनीती आखल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत 180 पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या (BJP) दिल्लीतील नेत्यांना करण्यात आल्याचे समजते. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) महायुतीच्या जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) प्राथमिक फॉर्म्युलाही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार भाजपने170-180, शिंदे गटाने सुमारे 70 व उर्वरित 58 जागा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात असेही प्रदेश भाजपमधील नेत्यांनी सुचवले असल्याचा दावा सूत्रांनी केला.
लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने दबाव आणून जास्त जागा पदरात पाडून घेतल्याची भावना भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे. गेल्या काही काळात महायुतीमध्ये शिंदे गटाचा प्रभाव वाढत असल्याची कुजबुजही भाजपच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाच्या दबावाला न जुमानता 170 ते 180 जागा कोणत्याही परिस्थितीत लढायच्याच. जेणेकरुन महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता येईल, असा भाजप नेत्यांचा मनसुबा असल्याचे समजते.
शिंदे गटाकडून 100 जागांची मागणी
एकीकडे भाजपकडून विधानसभेच्या 180 जागांवर लढण्याची तयारी सुरु असली तरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेकडून यापूर्वीच 100 जागांची मागणी करण्यात आली आहे. महायुती तुटू न देण्यासाठी शिंदे गटाची ही मागणी मान्य करायची झाल्यास भाजप आणि अजितदादा गटासाठी विधानसभेच्या 188 जागाच उरतील. अशावेळी भाजपच्या वाट्याला 120 ते 130 जागाच येतील. 100 टक्क्यांच्या स्ट्राईक रेटने या सर्व जागा जिंकणे, तसे अवघड आहे. त्यामुळे भाजप पुन्हा एकहाती बहुमत मिळण्यापासून दूर राहील आणि पुढील पाच वर्षे भाजपला पुन्हा अनेकांची मर्जी सांभाळत सरकार चालवावे लागेल. त्यामुळेच भाजपने 180 पेक्षा कमी जागा लढवू नये, अशी विनंती स्थानिक नेत्यांकडून भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांना करण्यात आल्याच समजते. भाजपने 2019 साली शिवसेनेसोबत विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी भाजपने 152 तर, शिवसेनेने 124 व इतरांनी 12 जागा लढवल्या होत्या.
आता भाजपने एकट्याने 180 जागा लढवल्यास विधानसभेला शिंदे गट आणि अजितदादा गटासाठी फक्त 108 जागा उरतील. यामध्ये शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या वाट्याला काय येणार, हा प्रश्नच आहे. त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जागावाटपाच्या या फॉर्म्युलावर राजी होतील, का याबाबत साशंकताच आहे.
आणखी वाचा
लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे सभेचे जागावाटप, विधानसभेला भाजपच ठरणार मोठा भाऊ!