Vidhan Sabha : लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे सभेचे जागावाटप, विधानसभेला भाजपच ठरणार मोठा भाऊ!
Vidhan Sabha Election: विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटवर अवलंबून असणार आहे, अशी माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) जागावाटप (Seat Sharing) करताना महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांमध्ये चांगलीच राजी-नाराजी पाहायला मिळाली आहे. महायुतीच्या जागावाटपात भाजप (BJP) मोठा भाऊ ठरला असून अजित पवारांचा राष्ट्रवादी धाकटा भाऊ असल्याचे दिसून आले. कारण, महायुतीच्या जागावाटपात भाजपाने 28 जागांवर निवडणूक लढवली. तर, शिवसेना शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या असून अजित पवारांना केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. मात्र आता लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाचा मुद्दा गाजायला लागला आहे. मात्र या संदर्भात मोठी अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे. लोकसभेचा स्ट्राईक रेटच ठरवणार महायुतीचे विधानसभेचे जागावाटप (Vidhan Sabha) ठरणार असल्याची मााहिती उच्चपदस्थ सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. त्यामुळे महायुतीत कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप कसे असणार यावर चर्चांना उधाण आले आहे. आता लोकसभेच्या निकालाच्या स्ट्राइक रेटवरच महायुतीचे जागावाटप निश्चित होईल अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रानी एबीपी माझाला दिली. लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये ज्या पक्षाचा स्ट्राइक रेट चांगला असेल त्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या स्ट्राइक रेटवर अवलंबून असणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे जिंकून येणे हा एकमेव निकष डोळ्यासमोर असल्यानेच लोकसभा निकालाच्या स्ट्राईक रेटवर विधानसभेच्या जागा निश्चित होतील अशी माहिती मिळत आहे.
लोकसभेच्या जागावाटपात नाराजी उघड
लोकसभेच्या महायुतीच्या जागावाटपात लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक 28 जागा घेतल्या. तर, मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेनं ओढून-ताणून 15 जागांपर्यंत मजल मारली होती. मात्र, जागावाटपात महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. पण, महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यावरुन, विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. तर, पक्षातील काही नेतेही नाराज झाले होते. आता, छगन भुजबळ यांनी जागावाटपातील आपली नाराजी उघड केली आहे.
विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत
विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. अजित दादा लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात भाषण करताना परखड भूमिका मांडली. तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असून भाजपाला जास्त जागा मिळतील, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. त्यामुळे, लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
हे ही वाचा :