(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nitin Gadkari: नितीन गडकरींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्पेशल 16; भाजपच्या सोशल इंजिनीअरिंगच्या प्रयोगाची चर्चा
Maharashtra Politics: नितीन गडकरी यांना भाजपच्या पहिल्या उमेदवारी यादीत स्थान न मिळाल्यामुळे बरीच चर्चा झाली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही गडकरींना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. अखेर गडकरींनी नागपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल केला.
नागपूर: राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज पूर्व विदर्भात बड्या राजकीय नेत्यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपचे नितीन गडकरी (Nitin Gadkari), सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांचा समावेश होता. उमेदवारी अर्ज भरताना या सर्व नेत्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.
या सगळ्यात नितीन गडकरी यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी बुधवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीचे सर्व घटक पक्षातील नेत्यांना त्यांनी सोबत ठेवत युतीचा धर्मच पाळत राजकीय समतोल साधला. एवढेच नाही तर नितीन गडकरी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना खुबीने सामाजिक समतोल साधला. त्यांच्या या सोशल इंजिनीअरिंगच्या प्रयोगची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
आज नितीन गडकरी यांचं उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत सूचक, अनुमोदक आणि सोबत असलेल्या 16 नेत्यांची यादी आपण पाहिली तर त्यामध्ये प्रत्येक जाती समूहाचे नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. गडकरी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना तीन कुणबी नेते होते. तेली समाजाचे ही दोन नेते गडकरी यांच्या सोबत होते. तसेच अनुसूचित जातीचे दोन नेते, मराठा समाजातील दोन नेते, तर वैश्य समाजातूनही दोघांचा गडकरी यांच्यासोबतच्या टीममध्ये समावेश होता. शिवाय दोन ब्राह्मण नेते, एक नेता हलवा समाजातून, एक नेता आदिवासी समाजातून ही नितीन गडकरी यांच्यासोबत उपस्थित होता. त्यामुळे गडकरी आणि त्यांच्या टीमने स्थानिक नेत्यांमधून सूचक अनुमोदक निवडतानाही सामाजिक समतोल साधला जाईल, याकडे बारकाईने लक्ष दिल्याचं लक्षात येते आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत नाव का नव्हतं? नितीन गडकरी म्हणाले...
भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत नितीन गडकरी यांचे नाव नव्हते. यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली होती. मोदी-शाह यांच्याकडून गडकरी यांना डावलले जात असल्याचा आरोपही विरोधकांनी केला होत. याबाबत 'एबीपी न्यूज'ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नितीन गडकरी यांनी सांगितले की, "आमच्या पक्षात एक व्यवस्था आहे. सर्वप्रथम भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व प्रमुख संसदीय मंडळाशी चर्चा करतात. पहिल्या यादीवेळी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात या या तीन राज्यातील टीमशी चर्चा करण्यात आली होती. पहिल्या यादीवेळी महाराष्ट्राची अजिबात चर्चा झाली नाही. महाराष्ट्राची चर्चा झाली तेव्हा त्या यादीत माझे नाव आले. त्यामागे कोणतेही विशेष कारण किंवा उद्दिष्ट नव्हते. पण विरोधी पक्षातील काही लोक त्याबद्दल विनाकारण बोलले", असे नितीन गडकरी यांनी सांगितले.
आणखी वाचा
तर नितीन गडकरी पुढील पंतप्रधान होतील! प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा