Pravin Gaikwad attack: प्रविण गायकवाडांवर हल्ला, भाजपचं थेट कनेक्शन; चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Sambhaji Brigade Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागे भाजपशी संबधित लोक असल्याचा आरोप होत आहे.

Sambhaji Brigade Pravin Gaikwad attack: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. यावेळी अत्यंत आक्रमक झालेल्या शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रविण गायकवाड यांना गाडीतून खेचून बाहेर काढले होते. प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांच्यावरील या हल्ल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर गंभीर आरोप केला होता. प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता. यावर आता चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टीकरण देत सर्व आरोप फेटाळले आहेत. ते सोमवारी नागपूरमध्ये 'एबीपी माझा'शी बोलत होते.
प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. अशा खालच्या लेव्हलचे कृत्य करणे भाजपच्या रक्तात नाही. प्रविण गायकवाड यांच्याबाबत झालेल्या घटनेची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, आमचा संबंध नाही. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता आहे पण कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही पक्षाचा असो तो आरोपी आहे. सुषमा अंधारेंना माहिती हवे की, कार्यकर्ते हे सगळे मंत्री आणि नेत्यांसोबत फोटो काढतात. पोलिसांनी संबंधितांवर योग्य कारवाई करायला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
Sushma Andhare: सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?
प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/खासदारकी/महामंडळ देऊनच टाका.. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय, असे ट्विट सुषमा अंधारे यांनी केले होते.
Chandrashekhar Bawankule: उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत म्हणून ते भाजपमध्ये येतात: चंद्रशेखर बावनकुळे
उद्धव ठाकरे यांना आपले कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, पक्ष सांभाळता येत नाहीत. ठाकरेंना कार्यकर्त्यांना भेटायला वेळ नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आपला नेता अव्हेलेबल नाही तर कार्यकर्ता कोणाकडे जाणार ? भाजपमध्ये त्यांना सर्व अव्हेलेबल आहे. भाजपचे 137 आमदार आहेत. त्यामुळे हे कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.
आणखी वाचा
अक्कलकोटमधील हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाडांना शरद पवारांचा फोन, म्हणाले...























