...तर अभिजित अडसूळ अपक्ष निवडणूक लढवणार, अमरावतीत नवनीत राणांची डोकेदुखी वाढणार?
महायुतीने अमरावतीतून नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. येथे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत.
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या देशासह राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी महायुती (Mhayuti) आणि विरोधी बाकावरील महाविकास आाघाडी (Maha Vikas Aghadi) यांनी अजूनही काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही जागांवरील वाद अद्याप कायम असून तो मिटवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षनेतृत्वाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, महायुतीची डोकेदुखी अद्याप कमी झालेली नाही. कारण अमरावती मतदारसंघातून महायुतीकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांना तिकीट मिळाल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील (Shivsena) नेते आनंदराव अडसूळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत.
अडसूळ, शिंदे यांच्यात बैठक, तोडगा काढण्याचा प्रयत्न
राणा यांना तिकीट मिळाल्यामुळे आनंदराव अडसूळ नाराज आहेत. ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे मी माघार घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा हाच विरोध थांबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंदराव अडसूळ यांच्यात 27 मार्च रोजी रात्री बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे यांनी अडसूळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आता अडसूळ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
अभिजित अडसूळ अपक्ष निवडणूक लढवणार
दुसरीकडे, आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ या निवडणुकीत उडी घेणार असल्याचे म्हटले जात आहे. तशी तयारी अडसूळ पिता-पुत्रांनी चालू केली आहे. शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीतून समाधानकारक तोडगा न निघाल्यास अभिजित अडसूळ अपक्ष म्हणून ही निवडणूक लढू शकतात. असे झाल्यास अडसूळ यांची ही एका प्रकारची बंडखोरीच असेल. परिणामी नवनीत राणा आणि महायुतीसाठी अमरावतीची निवडणूक कठीण जाऊ शकते. हे होऊ नये म्हणून 27 मार्च रोजीच्या बैठकीत अडसूळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचात सविस्तर चर्चा झाली आहे. या बैठकीत शिंदे यांनी अडसूळ यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
2019 साली राणा यांच्याकडून अडसूळ यांचा पराभव
2019 साली आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा हे राजकीय विरोधक आहेत. 2019 सालच्या निवडणुकीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अविभाजित) या पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. मात्र संसदेत राणा यांनी नेहमी भाजपला पुरक असणारी भूमिका घेतली होती. आता त्यांनी थेट भाजपत प्रवेश केला असून त्या आता महायुतीच्या अमरावतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. म्हणजेच अडसूळ यांना आता राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे अडसूळ यांची नाराजी दूर करण्यात महायुतीतील शीर्षस्थ नेत्यांना यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.