Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या अमरावतीत सभा होत आहे. मात्र, या सभेला आता वादाची किनार लाभली असून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Amravati Lok Sabha Constituency : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उद्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ उद्या, 24 एप्रिलला भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक अमित शाह संबोधित करणार आहेत. मात्र, या सभेला आता वादाची किनार लाभली असून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला कारण ठरलंय ते अमरावती येथील सायन्स कोरचे मैदान.
झालं असं की, ज्या मैदानावर उद्या भाजपने सभेचे आयोजन केले आहे, त्याच मैदानासाठी प्रहरच्या वतीने पैसे भरून त्याच दिवसाची रितसर परवानगी घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. परिणामी, मैदान मिळवण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून देखील ऐन वेळेवर हे मैदान भाजपला देण्यात येत असल्याने प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू हे चांगलेच आक्रमक झाले आहे. त्याने थेट आता जिल्हा प्रशासनाला इशारा देत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
परवानगी आम्हाला मग सभा भाजपची कशी?
अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानावरून भाजप विरुद्ध प्रहार आमने सामने आले आहेत. आमदार बच्चू कडू यांनी 24 एप्रिलसाठी सायन्स कोर मैदान बुक केलं होतं. यासाठी त्यांनी रितसर परवानगी मिळवून पैसे सुद्धा भरले. पण याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहिरसभा होत आहे. आमदार रवी राणा यांनी सांगितले की, आम्ही रितसर याची परवानगी मिळवली आहे. तर दुसरीकडे बच्चू कडू यांनी देखील याच दिवसासाठी मैदान सूनिश्चित केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नेमकं कुणाला या मैदानाची परवानगी दिली, यावरून सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बच्चू कडूंचा थेट जिल्हा प्रशासनाला इशारा
परिणामी, बच्चू कडू हे चांगले आक्रमक झाले आहे. जर 24 तारखेला आम्हाला सायन्स कोर मैदान उपलब्ध करून दिले नाही, तर आम्ही एक लाख लोकं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बसू, असा इशारा बच्चू कडूंनी जिल्हा प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आता बच्चू कडू यांची समजूत कशी घालणार हा पेच त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. उद्या सायन्स कोर मैदानावर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी जमा व्हावं, अशा सूचनाही प्रहारकडून करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या या सभेला वादाची किनार असल्याची शक्यता आहे.
मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त
संभाव्य परिस्थिति लक्षात घेता सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले आहेत. काही वेळात बच्चू कडू स्वत: या मैदानात जाऊन पाहणी करणार असल्याचेही सांगण्यात येतंय. त्यामुळे सुरक्षेच्या अनुषंगाने मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आता बच्चू कडू यांना गेटवरच पोलीस थांबवतील का आणि त्यांची समजूत काढतील का, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच पुढे बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात याकडेही सर्वांचं लक्ष लागले राहणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या