Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीणच? भाजप-शिवसेनेचा विरोध, नेमकं काय कारण?
Bhaskar Jadhav: भास्कर जाधवांच्या नावाला दोघांकडून विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामागे नेमकं काय कारण आहे जाणून घ्या सविस्तर.

मुंबई: विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तसे पत्र विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केले. वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी 28 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना आमदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीत यासंदर्भात ठराव संमत करण्यात आला होता. त्या ठरावानुसार सर्व आमदारांनी विरोधी पक्षनेत्याचे नाव ठरवण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आणि त्या नावाची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यास सर्वानुमते मान्यता दिली होती. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची भेट घेऊन तसे पत्र त्यांना दिले आहे. मात्र, भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेता होण्याचा मार्ग कठीण असल्याच्या चर्चा आहेत.
विरोध होण्याचं कारण काय?
भास्कर जाधवांच्या नावाला भाजप आणि शिवसेनेचा विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते. मविआ काळात तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी भाजपच्या आमदारांचं निलंबन केलं होतं. शिवसेना फुटीनंतर जाधवांनी एकनाथ शिंदेंवर टोकाची टीका केली होती. दोन्ही प्रमुख सत्ताधारी पक्षांकडून जाधवांच्या नावाला विरोधाचे संकेत दिसून येत आहेत. संख्याबळाअभावी केंद्रातही 5 वर्षे विरोधी पक्षनेता नव्हता. तत्कालीन लोकसभा अध्यक्षांनी पंतप्रधानांसोबत चर्चा करून निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातही विरोधी पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदाचे संख्या बळ नाही. विधानसभा अध्यक्षांकडून भाजप व शिवसेनेसोबत चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भास्कर जाधवांच्या नावाला दोघांकडून विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 डिसेंबर 2024 पासून हे पद रिक्त आहे.विरोधी पक्षनेता अद्याप निवडलेला नाही. विरोधी पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नसल्यामुळे हे पद रिक्त आहे. मात्र, आता या पदासाठी अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने आमदार भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भास्कर जाधव यांना मिळाले तर विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान होणारे ते कोकणातील सहावे लोकप्रतिनिधी ठरतील.
भास्कर जाधवांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
1992 - रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि अध्यक्षसुद्धा.
1995 - चिपळूण मतदारसंघाचे आमदार.
1999 - चिपळूण मतदारसंघाचे आमदार.
2006 - विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती.
2009 - गुहागर मतदारसंघातून आमदार.
2009 - नगरविकाससह 9 खात्यांचे मंत्रिपद.
2009 -रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्रिपद.
2009 - राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद.
2013 - पुन्हा वन खात्यासह सात खात्यांचे मंत्रिपद.
2014 -विधानसभेवर आमदार.
2019- विधानसभेवर आमदार.
2024 - विधानसभेवर आमदार.
2024 -शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड.
2025- विधानसभेचे विरोधी पक्षनेते
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
