Pankaja Munde : बीडच्या विकासाची आणि जाती-जातीतील सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका; पंकजा मुंडेंचा भावनिक साद
Beed Lok Sabha Election : बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतल्यानंतर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी मतदारांना जातीय सलोखा राखण्याचं आवाहन केलंय.
बीड : बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी प्रयत्न करत असून त्या विकासाची आणि जिल्ह्यातील जाती-जातीतील सलोख्याची तस्करी होऊ देऊ नका अशी साद भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जनतेला घातली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी बीडमध्ये सभा घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये येत्या 13 मार्च रोजी मतदान होणार आहे.
दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या केज येथील नगरपंचायतच्या नगरसेवकाच्या विरोधात कथित चंदन चोरी प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. विशेष म्हणजे या नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात देखील सहभाग दिसून आला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी केलेले हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे.
बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद?
बीडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मराठा आरक्षण आंदोलनाची त्याला किनार असल्याचं बोललं जातंय. मराठा आंदोलनासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी निवडणुकीत कुणालाही पाठिंबा जाहीर केला नसला तरी मराठा आरक्षणाच्या आड येणाऱ्या नेत्यांना पाडण्याचा आदेश मात्र दिला आहे. त्याचा परिणाम बीडच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलं आहे. मराठा विरुद्ध वंजारी, मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली गॅरंटी देत पंकजा मुंडेंसाठी मतदानाचं आवाहन केलं.
बीडमध्ये मोदींचा जातीऐवजी धर्मावर भर
पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दोन भव्य सभा बीड आणि अहमदनगरमध्ये झाल्या. या दोन्ही जागा आणि शिर्डी ही तिसरी जागा या महायुतीचा गड राहिल्या आहेत. तरीही कोणताही धोका न पत्करण्याच्या धोरणामुळे मोदींनी इथे सभा घेतल्या. 2009 पासून बीड लोकसभेची निवडणूक ही गोपीनाथ मुंडे या नावाभोवती फिरत आहे. गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कन्या असलेल्या पंकजासाठी मोदींनी मतदारांना साद घातली.
मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीडमध्ये किंवा एकूणच मराठवाड्यात मराठा समाजाच्या भावना सरकार विरुद्ध असल्याचं चित्र सध्यातरी आहे. इथे जातीवर मतांचं ध्रुवीकरण झालं तर त्याचा फायदा मविआला होऊ शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे मोदींनी इथे भाषणात जाती ऐवजी धर्मावर भर दिला, जिहादी दहशतवादाचा मुद्दा उचलला. हिंदू अस्मितेला कुरवाळण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रासमोरील इतर धोके मांडण्याचा प्रयत्न केला.
ही बातमी वाचा: