Beed : 'तुतारी'नं बजरंग सोनवणेंचा विजय लांबवला, बीडच्या मतदारात संभ्रमाच्या चर्चा
Beed Lok Sabha Election Results 2024 : बीड आणि गेवराई येथील मतदारांनी बजरंग सोनवणे यांना आघाडी दिल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. पण बीडमध्ये अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचा विजय अवघड झाला.
Beed, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये चुरशीची लढत झाली. संघर्षच्या लढतीत बजरंग सोनवणे यांचा विजय झाला, त्यांनी 6553 मतांनी विजय मिळवला. बीड आणि गेवराई येथील मतदारांनी बजरंग सोनवणे यांना आघाडी दिल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. पण बीडमध्ये अशोक थोरातांच्या तुतारीने बजरंग सोनवणेंचा विजय अवघड झाला. बजरंग सोनवणे यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस होता, तर अशोक थोरात यांना तुतारी हे चिन्ह मिळालं होतं. अशोक थोरात यांनी तब्बल 55 हजार मते मिळवली. थोरातांमुळेच बजरंग सोनवणे यांना थोडाफार फटका बसल्याची चर्चा आहे.
श्वास रोखायला धरणाऱ्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी अखेरच्या पाच फेऱ्यामध्ये आघाडी घेत विजय मिळवला. पण हा विजय बजरंग सोनवणे यांच्यासाठी सोपा नव्हता. बीडमधील मतदारांमध्ये तुतारी आणि तुतारी वाजविणाऱ्या माणूस या चिन्हामध्ये संभ्रम होता, अशी चर्चा आहे. बीड लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या 41 उमेदवाराची नावे 29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली. बहुजन महापार्टीचे उमेदवार अशोक भगोजी थोरात यांना तुतारी हे चिन्ह दिले, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बजरंग सोनवणे यांना तुतारी बाजविणारा माणूस हे चिन्ह दिले होते. दोन्ही चिन्हामध्ये संभ्रम होऊ शकतो, अशी चर्चा आणि शक्यता त्यावेळी होती.
बीडकरांमध्ये संभ्रम -
ईव्हीएमवर पहिल्या क्रमांकावर पंकजा मुंडे यांचे कमळ चिन्ह होते, दुसऱ्या क्रमांकावर बजरंग सोनवणे यांचं तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दुसऱ्या क्रमांकावर होते. चौथ्या क्रमांकावर अशोक थोरात यांचं तुतारी हे चिन्ह होते. बजरंग सोनवणे आणि अशोक थोरात यांच्यामध्ये फक्त एकाच बटणाचे अंतर होते. त्यामुळे बीडमधील ग्रामिण भागातील मतदार संभ्रम अवस्थेत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकांनी तुतारी वाजिवणारा माणूस या चिन्हाऐवजी तुतारीचे बटण दाबल्याची चर्चा आहे.
...अन्यथा लवकरच लागला असता निकाल
बीड लोकसभेची निवडणूक अतिशय संघर्षपूर्ण झाली. बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काटें की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला बजरंग सोनवणे आघाडीवर होते, तर त्यानंतर पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली. 22 व्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांच्याकडे 33 हजारांची आघाडी होती, पण अखेरच्या पाच ते सहा फेऱ्यामध्ये बजरंग सोनवणे यांना मोठी आघाडी मिळाली. पण थोरात यांना पडलेले मतदान तर बजरंग सोनवणे यांना जाहीर झालं असते, तर निकालाचे चित्र लवकरच स्पष्ट झाले असते, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागांवर विजय मिळाला?
देशपातळीवरील समीकरणं
एनडीए आघाडी- 294
इंडिया आघाडी- 232
इतर-17
महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल
महाविकास आघाडी- 29
महायुती- 18
अपक्ष- 1
महायुतीमधील पक्षीय बलाबल
भाजप- 9
शिवसेना (शिंदे गट)-7
राष्ट्रवादी काँग्रेस-1
महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?
काँग्रेस- 13
ठाकरे गट-9
शरद पवार गट-8