Anand Dighe Ashram : माझ्या साहेबांना पैशाने ओवाळता का? तुमच्यासारखे 50 मुख्यमंत्री त्यांच्यावर ओवाळून टाकू, आनंद दिघेंचे पत्र लेखन करणाऱ्याचा हल्लाबोल
Anand Dighe Ashram, ठाणे : आनंद दिघे यांचे पत्र लेखन करणारे नंदकुमार गोरुले यांनी खदखद बोलून दाखवली आहे.
Anand Dighe Ashram, ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रद्धास्थान असेलल्या आनंद दिघे यांच्या ठाण्यातील आश्रमात काही पदाधिकाऱ्यांनी ढोल वाजवणाऱ्या लोकांवर नोटा उधळल्या. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जाऊ लागला. त्यानंतर, नोटा उधाळण करणाऱ्यांची शिंदेंनी पक्षातून हकालपट्टीही केली. दरम्यान, आनंद दिघे यांचे पत्र लेखन करणारे नंदकुमार गोरुले यांनी याबाबत खदखद बोलून दाखवली आहे.
नंदकुमार गोरुले काय काय म्हणाले?
नंदकुमार गोरुले म्हणाले, दिघे साहेब मला नंदू म्हणायचे, 85 ते 95 पर्यंत साहेबांची पत्र मीच लिहीत होतो. मी फक्त साहेबांची पत्र लिहीत नव्हतो तर साहेबांचे संदेश आणि काही वेळेला त्यांच्या मुलाखती देखील मीच लिहीत होतो ते भाग्य मला लाभलेले आहे. त्यावेळेला राजन विचारे साहेब असायचेच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळायचं. साहेब रुग्णालयात असताना त्यांना आंघोळ घालणं, त्यांना भरवणं त्यांचे पाय चेपण हे सर्व करायला मला मिळालं हे कुठल्या जन्मीचं पुण्य होत हे मला माहीत नाही. माझा आज संपूर्ण ठाणेकरांना आणि महाराष्ट्राला एक प्रश्न आहे जे जे आनंदाश्रमात हजेरी लावून गेलेले आहेत आज जो हा काही नंगानाच सुरू आहे हे विचारणारे ठाण्यात फक्त एक राजन विचारेच आहेत का? असा सवालही नंदकुमार गोरुले यांनी केला.
पुढे बोलताना गोरुले म्हणाले, माझ्या साहेबांना तुम्ही पैशाने ओवाळताय, तुमच्यासारखे 50 मुख्यमंत्री पद आम्ही साहेबांवरून ओवाळून टाकू. सर्व सणांचा एक आदर्श वस्तूपाठ हा धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यालयातून बघितला जायचा. त्याचं आचरण अनुकरण संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशभरात व्हायचं आणि तुम्ही आज सांगताय साहेबांनी ही परंपरा पाडली. साहेबांच्या नावावर काय काय खपवता, तुमचा पैसा एवढा मोठा झाला की माझ्या साहेबांना तुम्ही विकत घ्याल. राजकीय यशावर तुम्ही दिघे साहेबांचं मोजमाप ठरवता? संपूर्ण महाराष्ट्रात आणि ठाण्यात तुम्हाला चॅलेंज देणारा एकच वाघ आहे तो म्हणजे राजन विचारे.. दिवसाला दीडशे पत्र मी एकटा लिहायचो, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे दुःख पिणारा महादेव आमचा त्या शिवालयात बसायचा आज पैसे उधळून असं त्यांना तुम्ही बदनाम करता. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना, माफी तर मागूच नका तुमची माफीच नकोय आम्हाला...
नरेश म्हस्के तुम्ही काय होता ओ, काय म्हणता तुम्ही, जॅकेट कोड घातला म्हणून तुम्ही काय देशाचे नेते झालात संपूर्ण ठाणे तुम्ही संपवल, ठाण्याला आणि ठाणेकरांना बदनाम केलंत. आमचे दिघे साहेब अहोरात्र तुमच्यासाठी लढले, अनेक प्रसंगी तुमच्यासाठी तुमचं रक्षण केलं. त्यांचा दरारा होता म्हणून तुम्ही ताठ मानेने फिरू शकत होतात. आज मी विचारू इच्छितो ठाणेकरांना कि याबद्दल तुम्ही कोणीच विचारना करणार नाहीत का? मी आहे कोल्हापूरचा पण मी स्वतःला ठाणेकर मानतो साहेबांबरोबर दहा वर्ष मी काढली आहेत. जुन्या कार्यकर्ते मित्रांनो स्वतःचे व्यवसाय सांभाळायला यांचे वरदहस्त तुम्हाला लागतात दिघे साहेब तुमचे गुरु होते तुम्हाला त्यांनी निर्माण केलं त्यामुळे तुम्ही बाहेर पडा आपल्या आनंदाश्रमाचं पावित्र्य नष्ट झालेलं आहे. आठवा बाहेरून जाणारे हजारो लोक रोज पायाला हात लावण्यासाठी येत होती, रिक्षातून गाड्यांमधून जाणारे लोक बाहेरून नमस्कार करायचे आज पैशाच्या जोरावर तुम्ही काय करून त्या ठेवलं आहे आनंदाश्रमाचं. आनंदाश्रमाचं जर पावित्र्य नष्ट झालं तर माझ्यासारखा एक एक शिवसैनिक हे खपून घेणार नाही हे लक्षात ठेवा, असंही गोरुले म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या