''अरे कमानीवर लिहिलेलं नाव झाकू शकाल, पण शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकाल?''
अमोल कोल्हेंनी आपल्या भाषणातून बाजारसमितीच्या कमानीवरील शरद पवारांचं नाव हटवल्यावरुन हल्लाबोल केला.
नाशिक : राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांसाठी 20 मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे, मुंबईसह, नाशिक, धुळेसह एकूण 13 लोकसभा मतदारसंघात (Loksabha Election) मतदान होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईत रोड शो केला. त्यानतंर, आज नाशिक व धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारासाठी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीची सभा नाशिकमधील (Nashik) सटाण्यात पार पडली. या सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) शेतकऱ्यांसाठी शरद पवारांचं योगदान विषद केलं. तसेच, मोदी सरकार हे शेतकरी विरोधी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmers) कसं मारक ठरंल, यावरही त्यांनी भाष्य केलं.
अमोल कोल्हेंनी आपल्या भाषणातून बाजारसमितीच्या कमानीवरील शरद पवारांचं नाव हटवल्यावरुन हल्लाबोल केला. ''पिंपळगाव बसवतला पंतप्रधानांची सभा झाली, जेव्हा इथं येऊन ते विचारत होते पवारसाहेबांनी काय केलं. त्या पंतप्रधानांना बाजारसमितीच्या कमानीवरचं नाव आधी झाकावं लागलं. अहो कारण ज्यांनी हे उभं केलंय, ज्यांनी केवळ ही इमारत नाही, केवळ ही बाजार समिती नाही, केवळ कमान नाही, त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला स्वाभिमानाने उभं केलंय. त्यांच्या मातीत येऊन प्रश्न विचारताना पंतप्रधानांनाही प्रश्न पडला असेल म्हणून कमानीवरील नाव झाकावं लागलं. पण, जेव्हा कमानीवरचं नाव झाकलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात याच भावना होत्या, अरे कमानीवर लिहिलेलं नाव काही काळापुरतं झाकू शकाल, पण शेतकऱ्यांच्या काळजावर कोरलेलं शरद पवारांचं नाव कसं झाकू शकाल,'' असे म्हणत खासदार कोल्हे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
संसदेत कांद्यावर कोणीही बोललं नाही
मोदींच्या सभेत कांदा उत्पादक शेतकरी कांद्यावर बोला एवढंच म्हणत होता, तर त्याला कॉलर पकडून बाहेर काढून देण्यात आले. कुठल्या रामराज्याची आम्ही अपेक्षा करायची. कांद्याला पूर्वी 4 हजार भाव होता, तर आज 800 रुपये भाव आहे. महाराष्ट्रातील 39 खासदार महायुतीचे होते, मात्र कोणीही कांद्यावर बोलले नाही. आम्ही कांद्यावर बोललो तर आमचे निलंबन केले, अशी आठवण कोल्हेंनी आपल्या भाषणातून सांगितली. भारती पवार आणि सुभाष भामरे कांद्यावर काहीच बोलले नाही, असेही कोल्हेंनी सांगितले.
कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली
शेतकऱ्याचे हित असलेले प्रश्न जर तुम्ही संसदेत मांडत नसताल तर... कांद्याला भाव नाही, अन् मोदीला मत नाही, असे कोल्हेंनी म्हटले. मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न ह्या भावना आमच्या कांद्याची जोडलेल्या असतात. पण कांद्याचा जेव्हा चिखल होतो तेव्हा आमच्या भावना दुखावतात. कांद्याची निर्यातबंदी उठवली ती फसवी आहे. भाजपा धोरणामुळे तुमच्या कांद्याची माती झाली. पाकिस्तानचे कंबरडे मोडणार होते तुम्ही ते आमच्या शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. 550 मेट्रिक टन डॉलर, 40 टक्के निर्यातशुल्क आपल्या माथी मारले. आपल्यापेक्षा इजिप्त, पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने तो कांदा उचलला जातो आहे. निर्यातबंदी करून भाजप सरकारने आमच्या ताटात माती कालवली, असे म्हणत कोल्हेंनी केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणावरुन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उद्देशून भाषण केलं.
शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा हिशोब घ्यायचा आहे
पंजाबमध्ये शेतकऱ्यांना अडवलं, अश्रुधारा, लाठीचार्ज केले. शेतकऱ्यांवर नेहमीच या सरकारने अन्याय केला आहे. म्हणूनच, शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा हिशोब घायचा आहे. केंद्रातील सरकार बदलणार हे काळ्या दगडावरची रेष आहे. केंद्रात इंडीया आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे, परिवर्तनाचे शिलेदार व्हा आणि महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहनही अमोल कोल्हेंनी आपल्या भाषणातून केले.