राज ठाकरे 'दिवार'चे अमिताभ, लाडकी बहीणच्या टीकवरही जितेंद्र आव्हाडांचा पलटवार
राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात. कधी ते बॉम्बे टू गोवा मधील अमिताभ असतात
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या भाषणातून नेहमीच कोपरखळ्या मारत असतात, राजकीय टोलेबाजीसह ते दिग्गजांना चिमटेही काढतात. तर, राज्य सरकारच्याही नवनवीन बाबींवरुन ते टोला लगावताना दिसून येतात. आज, पुन्हा एकदा राज ठाकरेंनी राज्य सरकारला टोला लगावत राष्ट्रवादी काँग्रेसलाही चिमटा काढला आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच, कोणाशी युती होईल किंवा आपल्यासाठी कोणती जागा सुटेल, याचा विचार करत बसू नका. आपल्याला 225 ते 250 जागा लढवायच्या आहेत, अशी घोषणाच राज ठाकरेंनी केली. तर, लाडकी बहीण योजनेवर बोलताना, अजित पवार व राष्ट्रवादीला टोलाही लगावला. त्यावरुन, आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.
राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात. कधी ते बॉम्बे टू गोवा मधील अमिताभ असतात, कधी दिवार मधला अमिताभ असतात, कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात. मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघ्नचा रोलही ते करतात. त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तसेच, राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरुन राष्ट्रवादीतील फुटीवरही भाष्य केलं होतं. त्यावरूनही जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. आम्हालाही वाटतं, दोन्ही भाऊ एकत्र आले तर बरं, असे आव्हाड यांनी म्हटलं.
दोन भाऊ एकत्र आले तर बरं
आम्हाला पण वाटतं, दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं, अशा शब्दात आव्हाड यांनी राज ठाकरेंनी काढलेल्या चिमट्याला प्रत्युत्तर दिलंय.
मनसेच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाष्य
अशी प्यादी वापरायची ही भाजपची खेळी आहे, सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत, त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही, असे म्हणत मनसेच्या स्वबळाच्या नाऱ्यावरही आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते राज ठाकरे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ… अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी, अशी मिश्कील टीपण्णी राज ठाकरे यांनी केली.