(Source: Poll of Polls)
Ajit Pawar : अजित पवार यांचे ब्रँडिंग, 'शब्दाला पक्का, अजितदादा' कॅम्पेन; विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा रोड मॅप काय ठरला?
NCP Meeting : विरोधकांना आपल्या नॅरेटिव्हवर आणा, आपला नॅरेटिव्ह सेट करा, तसेच अजित पवारांनी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी तळागाळापर्यंत करा अशा सूचना राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
मुंबई: आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) सोमवारी महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या 90 दिवसात प्लॅन बनवला जाणार असून प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार असून 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि सर्व प्रमुख नेते, आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते. त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय ठरलं?
- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या बैठकीत विधानसभेचा रोड मॅप ठरवण्यात आला.
- पुढच्या 90 दिवसात विधानसभा निवडणुकीचा प्लॅन राबवला जाणार.
- प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार.
- पक्षाकडून अजित पवार यांचे ब्रँडिंग केले जाणार.
- 'शब्दाला पक्का, अजितदादा' अशा आशयाचे कॅम्पेन राबवले जाणार.
- विरोधकांना आपल्या नरेटिव्हवर आणा, आपला नरेटीव्ह सेट करा.
- अर्थसंकल्पात अजितदादा यांनी घोषणा केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, त्याचा फायदा लोकांना करून द्या.
राष्ट्रवादीच्या बैठकीत येत्या 14 जुलैला बारामतीत जाहीर 'जन सन्मान' रॅली आयोजित करण्याचा ठराव पास करण्यात आला आहे. बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना, भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी असेल असं पक्षाने म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी मांडलेल्या बजेटच्या योजनांचा लाभ आणि बळ जनतेला मिळवून देण्यासाठी पक्ष म्हणून कराव्या लागणाऱ्या कामांची देखील रूपरेखा या जाहीर सभेत सादर केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.
अजित पवारांना 3 मतांची गरज
विधानपरिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद निवडणुकीसाठी दोन उमेदवार आहेत, तर हक्काच्या मतांची संख्या 43 इतकी आहे. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाला 3 मतांची गरज आहे. महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचा: