Video: ''पूर्वी आम्ही घास घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, इकडे आलो तर अदानी-अंबानीही ओळखतात''
अजित पवारांनी बारामतीमधील भाषणात पवार कुटुंबाचात सात-बाराच काढला. त्यामध्ये, पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्यापासूनचा पिढ्यान-पिढ्या इतिहास काढला
पुणे/बारामती - राज्याच्या राजकारणात हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आता सभांचा धडाका लागला आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय लढत असून पवार विरुद्ध सुळे असा संघर्ष रंगला आहे. शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत बाहेरुन आलेले पवार आणि मूळ पवार यांच्यात फरक असल्याचं म्हटलं होत. त्यावरुन, उमेदवार आणि पवार घराण्याच्या सून सुनेत्रा पवार ह्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं. तर, काहीजण लेक आणि सुनेत फरक करत असल्याचं म्हणत अजित पवारांनीही (Ajit Pawar) शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता, पुन्हा एकदा शरद पवार (Sharad Pawar) विरुद्ध अजित पवार सामना पवार कुटंबात रंगला असून बारामती येथील सभेतून अजित पवारांनी सगळंच काढलं. पुतण्या, काका, काकीसह पवार कुटुंबातील सर्वच विरोधकांवर हल्लाबोल केला. सगळं काही साहेबांनी केल, मग गेल्या 30-35 वर्षात आम्ही काय केलं, असा सवालही अजित पवारांनी जाहीर सभेतून विचारला.
अजित पवारांनी बारामतीमधील भाषणात पवार कुटुंबाचात सात-बाराच काढला. त्यामध्ये, पद्मश्री आप्पासाहेब पवार यांच्यापासूनचा पिढ्यान-पिढ्या इतिहास काढला. विद्या प्रतिष्ठान संस्थेचा दाखला देत युगेंद्र पवारांनी केलेल्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. विद्या प्रतिष्ठान संस्था वाढवण्यात आम्ही पुढाकार घेतलं, जमिन, इमारती याचा उल्लेख करत आमचे चिरंजीव म्हणतात हे सगळं साहेबांनी केलं, साहेबांचे आशीर्वाद होते पण तुम्ही सगळं चुकीचं का सागता, असा सवाल अजित पवारांनी विचारला. अजित पवारांनी आपल्या भाषणात बारामती तालुक्यातील विकासकामांचा इतिहास आणि कौटुंबीक राजकीय जडणघडणीवर भाष्य केलं. यावेळी, सुप्रिया सुळेंच्या लग्नापासून ते स्वत:च्या लग्नापर्यंत सगळं सांगिंतलं. तसेच, शरद पवार तेव्हा नाराज झाले होते, राजकारण सोडून काटेवाडीला जातो, असेही म्हणाले होते, असा दाखला देत मी राजकारणात कसा आलो, हेही अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितले.
आम्ही घास घास घासायचं
मी म्हटलं की, मुलाला निवडून दिलंय, लेकीला निवडून दिलंय, आता सुनेला निवडून द्या, तेव्हा काहींना वाईट वाटलं. मी देवेंद्र फडणवीस, एकनाथजी दिल्लीला जातो. आम्ही इकडं गेल्यामुळे आमची मोदींजींसोबत ओळख झाली. आमच्या अदानी-अंबानींच्याही ओळखी झाल्या, यापूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या. आम्ही घास घास घासाचयं, पण मोठी लोकं यायची अन् ह्यांनी केलं, ह्यांनी केल.. असं व्हायच आणि ते निघूनही जायच, असे म्हणत अजित पवारांनी केलेल्या कामाचं श्रेय वरिष्ठांना मिळायचं, आम्हा नाही, असे म्हटले.
विजय शिवतारेंनी केलं अजित पवारांचं कौतुक
विजय शिवतारे सध्या बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा प्रचार करत आहेत. ते आज बारामतीत एका प्रचारसभेला संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. व्यापक हितासाठी मी ही निवडणूक न लढवण्याचे ठरवले. बारामतीच्या निवडणुकीला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अजित पवार हे कार्यसम्राट नेतृत्त्व आहे. अजित पवार हे लोकांसाठी झटणारे नेतृत्त्व आहे, असे शिवतारे म्हणाले.