कुणी बोललं म्हणून अंगाला भोकं पडत नाहीत; सुप्रियाताईंच्या टीकेवर अजित दादांचा बारामतीतून पलटवार
बाधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो.
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज होमग्राऊंड म्हणजेच बारामतीमध्ये आहेत. आपल्या जनसन्मान यात्रेनिमित्त ते बारामतीमधील लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजित पवारांनी त्यांच्या बहिण आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. दोन दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी नाव न घएता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. मी सकाळी लवकर उठतो, या अजित पवार यांच्या भाषणातील वाक्यावरुन त्यांनी दादांवर खोचक शब्दात टीका केली होती. आता, बारामतीमध्ये लाडक्या बहिणींशी संवाद साधता अजित पवारांनी नाव घेता सु्प्रिया सुळेंना टोला लगावला. काहीजण म्हणतात दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण आम्ही कुठं म्हणलो की दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत प्रत्त्युतर दिलंय.
बाधकामातलं मला चांगलं कळतं, मी इंजिनिअर नसलो तरी इंजिनअरला जेवढं जमणार नाही, तेवढं मला जमतं. त्यामुळे, मी सकाळी सकाळी काही काम पाहण्यासाठी लवकर जात असतो, असे म्हणत राजकोट येथील पुतळा पाहणीसाठी मी सकाळी गेलो होतो, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले. अजित पवार यांनी बारामतीमधील जनसन्मान यात्रेत बोलताना विकासकामांच्या मुद्द्यांवर भर दिला. बारामतीमधील विकासकामे आणि सरकारी योजनांचा लाभ यांसंदर्भाने भाषण करत सुप्रिया सुळेंनी (Supriya sule) केलेल्या टीकेवरही अजित पवारांनी पलटवार केला. राजकीय टीका टिपण्णी टाळून आपण केवळ विकासावरच बोलायला पाहिजे. काहीजण बोलतात त्यांना बोलू द्या, बोललं म्हणून आपल्या अंगाला भोकं पडतात का?, असे म्हणत नाव न घेता सुप्रिया सुळेंवर पलटवार केला. काहीजण म्हणतात सकाळी कोण लवकर उठा म्हणतं, पण आम्ही कुठं म्हणतो तुम्ही म्हणलाय. म्हणतात की दुधवाला सकाळी लवकर उठतो, पण कुठं म्हटलं दुधवाला दुपारी उठतो, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. तसेच, अशा टीका टिपण्णीला महत्त्व देऊ नका, असे आवाहनही अजित पवार यांनी बारामतीकर व कार्यकर्त्यांना केलंय.
बारामतीच्या विकासावरच बोला
पोलिसांचा आदरयुक्त दबदबा बारामतीत असला पाहिजे, कुणी टुकार पणा केला तर पोरांना सांगा दादांनी पोलिसांनी टाईट केलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा असेल तर सोडणार नाही, आम्ही खऱ्याच्या पाठीशी राहणार. बदलापूर आणि पश्चिम बंगालमध्ये जे झालं ते होता कामा नये, नराधमांना फाशी दिली पाहिजे. त्यांचे कटिंग केलं पाहिजे, अशा शब्दात अजित पवार यांनी दोन्ही घटनेवर संताप व्यक्त केला. पूर्वीएवढं आता मला बारामतीला येता येत नाही, पण गणपती बसणार त्या दिवशी मी बारामतीत आहे. मी आपल्या भागात चांगले करण्याचा प्रयत्न केला आणि करतो. पुढच्या गोष्टी घडायच्या त्या घडतील. 287 मतदारसंघातील जेवढे आकडे आहेत, तेवढा बारामतीच्या निधीचा आकडा आहे. बारामतीत नाईट लँडिंग करून घेतोय, बारामतीत कुठंही थुंकायचं नाही. सध्या जिथं बस डेपो आहे तिथं आम्ही कॅन्सर हॉस्पिटल करतो आहे. काम करण्याची धमक नेतृत्वामध्ये असली पाहिजे, असे म्हणत विकासावर भाष्य करा, असे आवाहन कार्यकर्त्यांना अजित पवारांनी केले.
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे
कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही. काही लोकांचा एक डायलॉग मी सकाळी लवकर उठतो माझ्यामुळे बंद झाला. दूधवाला पण उठतो? तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला चहा करायला लागतो. आदरणीय पवार साहेबांनी आजपर्यंत कधी असं भाषण केलं आहे का? अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांना खासदार सुप्रिया सुळे यांनी झोडपून काढलं होतं. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य केलं होतं. याच वक्तव्याचा सुप्रिया सुळे यांनी पुरंदरमध्ये बोलताना चांगलाच समाचार घेतला. त्यावर, बारामतीतून अजित पवारांनी पलटवार केला.
हेही वाचा
Rain : मी शेतकऱ्यांचं नुकसान वाचवतो, पण माझंच नुकसान झालंय; पंजाबराव डख यांचं सोयाबिन गेलं वाहून