Ahmednagar News: श्रीगोंद्यात बबनराव पाचपुतेंची उमेदवारी धोक्यात? विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 'या' नेत्याने ठोकला शड्डू
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरु आहे. याठिकाणी भाजपचे बबनराव पाचपुते विद्यमान आमदार आहेत. मात्र, आता याठिकाणी भाजपमधील अन्य नेत्यांनी दावा ठोकला आहे.
श्रीगोंदा, अहमदनगर: लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली असून आता सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने कामाला लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघ (Shrigonda assembly constituency) सध्या चांगला चर्चेत आहे. या ठिकाणी भाजपचे (BJP) विद्यमान आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) हे असून भाजपमधूनच अनेकजण इच्छूक असल्यामुळे आता बबनराव पाचपुते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार का? की ठिकाणी खांदेपालट होणार याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पाठोपाठ आता भाजपमधूनच सुवर्णा पाचपुते यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. निवडणुकीसाठी गेल्या वर्षभर त्या श्रीगोंदा मतदार संघात जनसंपर्क करत आहेत. त्यातच सुवर्णा पाचपुते यांचे "फिक्स उमेदवार सर्वसामान्य जनतेतील आमदार" अशा आशयाचे बॅनर श्रीगोंदा मतदारसंघात लागले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सुवर्णा पाचपुते यांची गेल्या विधानसभा निवडणुकीतच तयारी झाली होती. मात्र, ऐनवेळेस पक्षातील वरिष्ठांनी थांबण्यास सांगितल्यामुळे आपण थांबलो होतो. परंतु, यावेळेस सर्वच वरिष्ठ नेते आपल्याबरोबर असून भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्याला उमेदवारीसाठी गळ घालत आहेत. जनतेच्या मनातील आमदार असल्यामुळे यावेळेस भाजपकडून श्रीगोंदा मतदारसंघात आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा सुवर्णा पाचपुते यांनी केला आहे. त्यातच गेल्यावेळी बाहेरच्या पक्षातून प्रवेश झाले पक्षाने आपल्याला थांबायला सांगितले. मात्र, जे मुळ भाजपमधील आहेत त्यांच्यात नाराजी पाहायला मिळाली आता पक्ष निष्ठावंतांना संधी देणार का हे पाहायचे आहे, असे सुवर्णा पाचपुते म्हणाल्या. बाहेरून पक्षात आलेल्यांमळे निष्ठावंतांना नेहमीच डावलले गेले, अशी खंतही यावेळी सुवर्णा पाचपुते यांनी बोलून दाखवली.
शिवाजी कर्डीले श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत
भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी राहुरी आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघावर दावा असणारे माजी आमदार शिवाजी कर्डीले हे श्रीगोंदा विधानसभा (Shrigonda assembly constituency) मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे. पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माझी तयारी आहे. मला पैलवानकीचा छंद आहे. त्यामुळे पैलवानाला बाराही महिने व्यायाम करावा लागतो, तरच तो फडात यशस्वी होतो. तसेच मी एक निवडणूक संपली की पुढच्या निवडणुकीची तयारी करतो, असे कर्डीले यांनी म्हटले होते. त्यामुळे आता श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा