Manoj Jarange: 'जरांगेंना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही तर...', भाजपच्या परिणय फुकेंचा मनोज जरांगेंवर हल्लाबोल
Manoj Jarange: मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, म्हणत विधान परिषद सदस्य परिणय फुके यांचा मनोज जरांगे यांचावर घणाघात केला आहे.
जालना: मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर काही मागण्या पुर्ण व्हाव्या, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. सरकारला यावेळी गुडघ्यावर टेकवल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य देखील जरांगे यांनी केला आहे. यावर बोलताना गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार परिणय फुके यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर हल्लाबोल करत मनोज जरांगे यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्यांना मीडियामध्ये राहायचं आहे असं मोठं वक्तव्य केलं आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange) जे बोलत आहेत हे सर्व त्यांची अहंकारी वृत्ती बोलत आहे. त्यांनी अहंकारी वृत्ती वापरू नये ते एका समाजासाठी लढत आहेत. त्यांना आरक्षण नको आहे. त्यांना मुद्दे बनून न्यूज मिडीयामध्ये राहायचं आहे, म्हणून ते हे सर्व करीत आहे आणि मराठा समाजाला सरकारने ईडब्ल्यूएसमध्ये 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आरक्षण फार मोठे आहे आणि एका बाजूला ओबीसी समाजामध्ये 353 जाती आहेत, त्यांना 19 टक्के आरक्षण आहे.
जर मराठा समाज यामध्ये समाविष्ट झाला तर 354 जाती होतील आणि आरक्षण 19 टक्केच राहील परंतु मराठा समाजाला एकट्या ईडब्ल्यूएस मध्ये 10 टक्के आरक्षण सरकारने दिलाय आणि ही फार मोठी बाब आहे. आता मनोज जरांगे पाटील हे फक्त मीडियामध्ये राहण्यासाठी आणि आपली महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य आणि उपोषण करत आहेत. आता त्यामागे त्यांची कोणती महत्त्वकांक्षा आहे. हे समाजाने ठरवावं असा खोचक टोला परीनय फुके यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना लगावला आहे. ते गोंदियामध्ये माध्यमांशी बोलत होते.
गोंदिया विधानसभेची जागा भाजप लढणार
गोंदिया विधानसभेची जागा भाजपा लढणार का याबाबत बोलताना परिणय फुके म्हणाले, गोंदिया विधानसभाची जागा ही भाजप लढणार यावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपाचा उमेदवार कोण याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्याच्या चारही विधानसभेवर भाजपचा दावा
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभाच्या जागेवर भाजपाने दावा ठोकला असून परिणय फुके यांनी ठामपणे सांगितले की, गोंदिया जिल्हा विधानसभेतील चारही जागा भाजपा जिंकणार. तुम्ही लिहून ठेवा या चारही जागा भाजपा जिंकणार असा दावा केला आहे. गोंदिया जिल्हा विधानसभेमध्ये तिरोडा-गोरेगाव विधानसभेची जागा ही भाजपाकडे आहे. तर अर्जुनी मोरगाव विधानसभेची जागा ही राष्ट्रवादीकडे अजित पवार गटाकडे आहे. गोंदिया विधानसभेची जागा अपक्ष आमदार यांच्याकडे आणि देवरी-आमगाव विधानसभेची जागा काँग्रेसकडे आहे. गोंदियात एकमेव जागा भाजपकडे असून सुद्धा परिणय फुके यांनी चारही विधानसभेवर दावा केल्याने पुन्हा एकदा महायुतीत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.