Parbhani News: संतप्त महिलांनी दारू विक्रेत्यांच्या घरात घुसून उद्ध्वस्त केला गावठी दारूचा अड्डा, रणरागिणींचे रौद्र रुप पाहून पोलिसांनी केली कारवाई
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील गडदगव्हाण फुलवाडीतील प्रकार, हातभट्टीची दारू उद्ध्वस्त करत पोहोचल्या पोलीस ठाण्यात..
Parbhani News: घराघरात हातभट्टीच्या दारूच्या व्यसनामुळे भांडण ठरलेलं. याबाबत तक्रार करूनही उपयोग होत नसल्याने गावातील ५० हून अधिक संतप्त महिलांनी गावठी दारूच्या अड्डे चालवणाऱ्या विक्रेत्यांच्या घरात घुसून ही दारू उद्ध्वस्त करत थेट पोलीस ठाणे गाठले आहे. महिलांचे रौद्ररुप पाहून पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केल्याची घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील गडद गव्हाण फुलवाडी येथे घडली आहे.
जिंतूर तालुक्यातील गडदगव्हाण फुलवाडी येथे मागील अनेक महिन्यांपासून गावठी हातभट्टी दारूची अवैध विक्री केली जात आहे. गावातील अनेक गावकरी, तरुण या अड्ड्यांवर जातात. गावातील व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत असून हातभट्टीची दारू घेऊन घराघरात भांडणे होत असल्याच्या अनेक तक्रारी महिलांनी केल्या. परंतू या तक्रारींचा उपयोग झाला नसल्याने शेवटी गावातील 50 पेक्षा जास्त संतापलेल्या महिलांनी थेट दारू विक्रेत्याच्या घरी जात ही दारू नष्ट केली. यावेळी दारू विक्रेत्यांनी या महिलांसोबत धक्काबुक्कीही केलीये. दरम्यान, ही दारू नष्ट करून या महिला थेट पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्या असून महिलांचे रौद्ररूप पाहून जिंतूर पोलिसांनी अवैध विक्री दारू करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, यापुढे गावात अशा प्रकारे दारू विक्री केली जाऊ नये अशी मागणी या महिलांनी केली आहे.
व्यसनाधिनतेचे वाढते प्रमाण आणि अवैध दारू विक्रीमुळे जिंतूरमधील गदगव्हाण फुलवाडी गावात अनेक तरूण हातभट्टीच्या दारूच्या अड्ड्यांवर जातात. दारू पिऊन मारहाण केल्याचे प्रकारही या गावात घराघरांमध्ये सर्रास दिसून येतात. अवैधरित्या चालणाऱ्या या दारूच्या अड्ड्यांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी उचललेल्या या पावलाची गावात चर्चा होत आहे. अनेक तक्रारी करूनही याचा फायदा होत नसल्याने संतापाच्या भरात महिलांनी विक्रेत्यांच्या घरात घुसून दारू नष्ट केल्याचे दिसून आले. यानंतर त्या थेट जिंतूर पोलिस ठाणे गाठून पोलिसांना अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले. महिलांचे रौद्ररूप पाहून जिंतूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली.
हेही वाचा: