Parbhani : नागोबाच्या मुर्तीची चोरी अन् गावावर 'नागोबा कोपला', जिथे-तिथे नागाचे दर्शन, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
परभणीच्या गंगाखेडमधील कोद्री गावातून नागोबाची पुरातन मूर्ती चोरीला गेल्यानंतर त्या गावात एका नागाची वावर वाढल्याचं दिसून येतंय. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

मुंबई: मंदिरातील मूर्ती चोरी होते आणि गावात त्या दृष्टीने काही तर अघटीत घडते, आजपर्यंत असे अनेक प्रकार आपण सिनेमांमध्ये पाहिले आहेत. अशीच एक घटना परभणीच्या गंगाखेडमध्ये घडली आहे. गावच्या मंदिरातील पुरातन नागोबाची मूर्ती चोरी (an old idol of snake was stolen) झाली अन् मंदिर, गावात नाग दिसायला लागला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माळरानावर वसलेल्या कोद्री गावात 50 ते 60 वर्षापुर्वीपासूनचे भव्य मंदिर आहे. विठ्ठल रुक्मिणी, हनुमान, महादेव अन् गावातील सोपान काका महाराज उखळीकर यांच्या जुन्या मूर्ती तसेच बाहेर एका बाजूला नागोबा अन् दुसऱ्या बाजूला गणपती असं हे भव्य मंदिर. हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नागपंचमी असो की रोजची पूजा, मोठ्या भक्तिभावाने हे केली जाते. मात्र 13 जुलै रोजीच्या गुरुपौर्णिमेच्या रात्री इथली पुरातन अशी नागोबाची मूर्तीच अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. जेव्हापासून ही मूर्ती चोरीला गेली तेव्हापासून मंदिर आणि गावच्या परिसरात रोजच मोठा नाग दिसतोय. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पौर्णिमेच्या दिवशीच जुनी अशी नागोबाची मूर्ती चोरीला गेल्याने गावात जिकडे-तिकडे याच चर्चा रंगू लागल्या आहेत. कुणी शेताकडे जाताना साप दिसेल, कुणी गावात फिरताना दिसेल याच भीतीत आहे. त्यातच महिलांमध्ये जास्त भीती निर्माण झाली असून ही मूर्ती गेल्याने काही तरी अघटित घडते की काय असा प्रश्न त्यांना पडलाय. गावकऱ्यांनी गंगाखेड पोलिसांत मूर्ती चोरीची तक्रार दिली असून चोरीला गेलेली मूर्ती लवकरात लवकर शोधावी अशी मागणी गावकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे. या मूर्तीचोरीचा तपास सुरु असल्याचे सांगून पोलीस या प्रकरणात कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत.
दरम्यान या मुर्ती चोरीनंतर गावात सलग दोन दिवस साप दिसतोय असं गावकऱ्यांनी सांगितले आहे. दिवसभरात केव्हाही साप दिसेल या भीतीतच गावकरी आहेत. लवकरात लवकर जर मूर्ती मिळाली नाही गावात अंधश्रद्धा पसरण्याच्या अगोदर किमान दुसरी मूर्ती इथे बसवण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत गावकरी आहेत. मात्र या गावातील प्रकारची चर्चा ही केवळ गंगाखेडचं नाही तर जिल्ह्यात रंगू लागली आहे.























